Breaking News

कोल्हापूरचा भगवा पुसला जाणार नाही, सांगून उद्धवजींनी योग्य इशारा दिला मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हिंदुत्व आणि भगवा रंग पुसला जाणार नाही, असे सांगितले, ही आनंदाची बाब आहे. उद्धवजींच्या भाषणातील योग्य इशारा समजणाऱ्यांसाठी पुरेसा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

कोल्हापुरातील शिवसेनेच्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले की, ती मते पुन्हा शिवसेनेकडे आणता येणार नाहीत. पालकमंत्री सतेज पाटील यांची पद्धती आहे की, ते संपूर्ण मतदारसंघ ताब्यात घेतील. याचा शिवसैनिकांनी विचार करावा. कोल्हापूरचा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे आणि तो कायमचा काँग्रेसच्या हाती जाऊ नये, असा आमचा आग्रह आहे. आपसातली भांडणे चालू राहिली तरीही हा मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांकडून निसटू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की, कोल्हापुरातील भगवा संपवू नये असे आवाहन मा. उद्धव ठाकरे यांनी केले. तो भगवा काँग्रेस नाही हे सर्वसामान्यांना कळते. भगवा म्हणजे भाजपा हे सुद्धा लोकांना कळते. समझने वालों को इशारा काफी है. शिवसैनिकांनीही विचार करावा की, भगवा म्हणजे भाजपा की काँग्रेस.

महाविकास आघाडीच्या नव्या प्रयोगात, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ अशा एकेक शिवसेनेची परंपरागत ताकद असलेल्या कोल्हापूरमधील जागा जातील. कारण हे मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडणार नाहीत. अशा स्थितीत, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके अशा शिवसैनिकांचा बळी देणार का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भगव्याला मत द्या सांगत एक प्रकारे भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केले आहे. कोल्हापुरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसैनिकांना त्याग करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे वक्तव्य करत हिंदू हृदयसम्राट बनण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते बनण्याचा कोणी प्रयत्न केलेला नसल्याची सारवा सारव केली. तसेच हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब तुम्हीच लावत आहात, असा उपरोधिक टोमणाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुख्यमंत्रिपद माझं टिकवा. त्याग सेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी करा, अशा आशयाचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होते. ७ पैकी ५ वेळा कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेने जिंकली होती. पण सत्तेच्या हव्यासापायी उद्धव ठाकरेंनी ही जागा काँग्रेस उमेदवाराला सोडून सेनेच्या कट्टर सैनिकाला त्याग करायला लावला. कट्टर हिंदुत्ववादी असणारी कोल्हापूर उत्तरची सीट हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला दिली गेली. शेवटी अविश्वासाने आलेलं सरकार टिकविण्याचा मुख्यमंत्री पुरेपूर प्रयत्न करतायत अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान उत्तर कोल्हापूर पोट निवडणूकीवर चंद्रकांत पाटील यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. मात्र भाजपा उमेदवार निवडूण येवू नये याकरिता स्थानिक पातळीवर संग्राम पाटील आणि धनंजय महाडीक हे प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवर सुरु असून हा एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनाच अप्रत्यक्ष शह देण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *