Breaking News

गज्जा दत्ताराम पवार ( GDP ) पडला … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावर आधारीत काल्पनिक कथा

आज  गावात  देशभक्तीची  प्रमाणपत्र वाटण्यात येत होती, देश अगदी आर्थिकदृष्ट्या जरी घरंगळत जात असला तरी देशभक्तीच्या उधाणात व्यवस्थित तरंगत असताना, पम्या ढोपरं फोडीत कार्यक्रम चालू असलेल्या सभागृहाच्या दारात आला, मोठ्याने ओरडला आपला जी डी पी पडला. कार्यक्रमाला अर्थशात्र विभागाचे घोणसे सर उपस्थित होते ते अचानक उभे राहिले आणि सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेतलं

” बघा आपला  देश महासत्ता होण्यापासून  कोणीच अडवू शकत नाही अगदी नेहरू सुद्धा. या पम्या दादांचं शिक्षण तिसरी सुद्धा नाही, त्यांना सुद्धा जी डी पी पडला हे कळतंय आज कालच्या पोरांनी जरा शिकावं” घोणसे सरांनी टाळ्या वाजवल्या तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्यानंतर बऱ्याच जणांचं कन्फयुजन वाढत गेलं आणि पम्या सुद्धा आपण काही चुकीचं बोललो का ? म्हणून बुचकळ्यात पडला. शेवटी पुन्हां एकदा बोलला ” तुम्हाला समजतंय काय जी  डी पी पडला शरद दादा स्वतः बोलला जी डी पी मानेसहित पडला आपल्याला जायला हवं उरका कार्यक्रम ” सरपंच बोलले”.

त्या जी डी पी  ला जाऊदे गाढवाच्या गांडीत देशभक्ती सिद्ध करणं आणि तशी सर्टिफिकेट देणं सध्या महत्वाचं आहे. या कार्यक्रमापेक्षा जी डी पी महतवाचा नाही ” असं म्हणून पुढचा कार्यक्रम सुरु झाला. पम्या ने तोपर्यंत गावभर बातमी केली होती. मान्यवर धुरळा उडवीत निघून गेले. सरपंच मात्र जरा घाबरला. त्याला एकापाठोपाठ एक गज्जा सोबत झालेल्या घटना एका पाठोपाठ एक आठवू लागल्या. धनेश भाऊ सरपंच व्हायच्या आधी जी डी पी म्हणजेच गज्जा दत्ताराम पवार व्यवस्थित होता. गज्जाची बायको सुंदर आणि धनेश भाऊ आयुष्याचा वसाडा माणूस त्याला गज्जाचं सुख बघवलं नाही. त्याने गज्जाच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण केला. गज्जाने आपल्या बायकोला उठता बसता तुडवायला सुरुवात केली. एका वर्षातच गज्जा वसाडा झाला. गज्जा कामावर जाईनासा झाला. सरपंचाने १०० योजना गज्जा पुढे ठेवल्या. पण त्या बिन कामी निघाल्या, उलट फसवणूक करून सरपंचाने गज्जाचं घर आपल्या नावावर करून घेतलं, थोड्या दिवसात ते विकलं ही. लोकांना आपल्या बद्दल काही वेगळं वाटू नये म्हणून जुन्या गुरांच्या गोठ्यात गज्जाला सरपंचाने आसरा दिला. गज्जा दारू पूर्वी संध्याकाळची पित होता, नंतर दुपारी सुरु केली आणि काही दिवसातच गज्जा तोंड धुवायच्या आधीच पिऊ लागला. गावातले लोकं बोलू लागले जी डि पी आता काय जास्त दिवस जगत नाय सगळ्यांना हे कळून चुकलं. सरपंचामुळेच आज जी डि पी ची अशी अवस्था झालेली आहे. पण उघड उघड बोलायला कोणी तयार नाही. तसा गज्जा कधी पडला नव्हता. ही पहिलीच वेळ होती म्हणून सरपंचाचे डोळे पांढरे झाले होते. सरपंचाने त्याच्या फेवर मधल्या चौघांना थांबवलं.

सरपंच ” हे  बघा ह्या सगला माझ्यावर येण्याचा जास्त संभव हाय तं, माझं असं म्हणणं हाय की याचा सगला खापर कोरोनावर फोडा. कोरोनामुळे आपला जी डी पी म्हणजेच गज्जा दत्ताराम पवार  उध्वस्त झाला. म्हणजे साप ही मेला आणि काठी सुद्धा नाही तुटली.

हळूहळू अख्खा गाव जमा झाला नेमका जी डी पी कुठं पडलाय हे कोणालाच माहिती नाही. शेवटी पम्या आला. पम्याला विचारलं आर बाबा जी डी पी नक्की पाडलाय कुठं, हीत कोरोनाचा आधीच  चाप बसलाय. ही बातमी भायर गेली तर अख्खा गाव शील करतील. किऱ्या बोलला “पम्याला  म्हाईत असल. पहिला जी डी पी पडलेला त्यांनच बघितलान” पम्या थोडा शांत झाला आणि  बोलला ” मी नाय बा बघितला ” पुन्हा एकदा शांतता होते. सरपंच भडकून बोलला ” रांडच्या अख्या  गावभर तूच बातमी केलीस ना? जी डी पी पडलाय, जी डी पी पडलाय आणि आता बोलतोस म्हाईत नाय गांजा नाय ना वडलायस? ” पम्या आता मात्र भानावर आला आणि चटकन बोलला ” शरद दादा बोलले म्हणजे शरद दादाला म्हाईत  असल. शरद तोंडात तंबाखू टाकता टाकता थांबला त्याचा मेंदू चकरावला तो हेच आठवू लागला आपण कधी पाहिलं? आपण कधी बोललेलो?  आणि आपण जे बोललॊ ते आपल्याला कसं माहित नाही?

शरद पटकन  बोलला ” मी  बोललोच नाही असं मी सकाळी बांधावर उन्ह घेत होतो, तेवढाच बाहेर पडलो. त्यानंतर  आता “आता मात्र पम्या वैतागला ” शरददा काय तू पण सकाळी बांधावर बसला होतास पेपर हातात धरून होतास नाय दुपारच्या टायमाला एवढा पण खोटा बोलू नुको ” शरद  वैतागला ” पम्या उगाच माझ्यावर आळ आणू नको खरंखोटं मंगळवारी देवळात करीन नारळ देऊन”.नारळाचं नावं काढताच पम्या थरथरायला लागला आणि वैतागला” नारळ तुझ्यावरनाच फिरविन सकाळी पेपर वाचता वाचता तूच बोललास ना रे तका “जी डी पी मानंसहित पडला” म्हणून. शरदने डोक्याला अजून जोर दिला आणि जोरजोरात हसायला लागला आणि एकदाच बोलला “आर रांडच्या एवढा मोठा घोळ प्रधानमंत्री सुद्धा करत नाय “पम्या  बोलला “म्हणजे”? शरद बोलला ” आर मी बातमी वाचत होतो” जी डी पी मायनस मध्ये पडला” आणि रांडच्या तू ऐकलास की आपला जी डी पी मानेसहित पडला? अरे येड्या जी डी पी म्हणजे तो वेगळा आणि आपला गज्जा दत्ताराम पवार वेगळा तशी दोघांची पण अवस्था सेम आहे, पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. इतक्यात गज्जा भिंतीला धरत धरत फुल टाईट होऊन पोचला आणि बोलू लागला ” कोणी  रांडच्यान माझी अफवा उडवलानं त्याची माय … एवढं बोलूं गज्जा भिंतीला धरून तसाच खाली घसरत पडला. जी डी पी भले कसाही असला आपण त्याच वाट्टोळं केलं असलं ते लोकांना माहिती असूनही मला अवाक्षर बोलत नाहीत हे पाहून सरपंच मनातल्या मनात खुश झाला आणि मोठं मन करून जी डी पी ला आपल्या गाडीत बसवायला सांगितला आणि  सरपंच जी डी पी ला सन्मानपूर्वक गोठ्यात टाकायला घेऊन गेला.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *