Breaking News

जय भिम: स्वत:बरोबर व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांना प्रश्न आदीवासींचे प्रश्न, पोलिस दलांकडून होणारा अन्याय आणि व्यवस्थेची उदासीनता

भारतरत्न, स्वतंत्र भारताचे घटनाकार डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी देशातील लोकशाही टिकविण्यासाठी आणि निरोगी (कोणत्याही अभिलाषेला, धर्माला बळी न पडणारा) समाज निर्मिती करण्यासाठी कायदेशीररीत्या काय करायला हवे आणि काय नको करायला पाहिजे या गोष्टींचा एक प्रकारे धडाच राज्यघटनेच्या माध्यमातून संबध भारतीयांना घालून दिला. परंतु या लोकशाहीप्रधान असलेल्या भारतात लोकशाही संसाधनांचा वापर करत अनेक अनिष्ट प्रथांना काहीजणांनी नव्याने जन्म दिला. तर बरेचजण त्या अनिष्ट प्रथांचा भाग बनून स्वत:च्या वैयक्तीक फायद्याकरीता त्या व्यवस्थेचे लाभार्थी बनत असल्याचे आपल्या आजूबाजूला पाह्यला मिळत आहे.

जय भिम हा मुळ तामीळ भाषेतील चित्रपट, वास्तविक न्यायाधीश चंद्रू यांनी मानवी हक्कासाठीच्या दिलेल्या लढाईची माहिती देणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून फक्त न्यायाधीश चंद्रू यांच्या लढ्याची आणि पोलिस दलाकडून होणाऱ्या अत्याचाराची कहाणी नाही तर त्याच्या जोडीला असलेल्या जातींची उतरंड, एकाने दुसऱ्याला नाकारलेला अधिकार, आर्थिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्थेचा भाग असणाऱ्यांवरही प्रकाशझोत टाकतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच आदिवासी समाजातील काही जातींना ब्रिटीशानी गुन्हेगार जाती म्हणून शिक्कामोर्तब केलेल्या समाजात सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या एका जोडप्याला सामाजिकस्तरावर असलेल्या विषमतेला सामोरे जावे लागत असल्याचे दाखविण्यात आले आहे. एका ग्रामीण खेड्यात ही आदीवासी जमात साप पकडणे, उंदीर पकडणे आदी कामे करत असल्याची दाखविण्यात आले आहे. ज्या व्यक्तीच्या घरी साप पकडायला जातो तो व्यक्ती जन्माने उच्चवर्णीय आणि राजकियदृष्ट्या ताकदवान असल्याचा अर्थात सरपंच असलेल्या व्यक्तीच्या घरी गेल्याचे दाखविण्यात आले आहे. सदरची घटना १९९५ सालची असली तरी अनेक गावांमध्ये किंवा देशाच्या ग्रामीण भागात थोड्याफार फरकाने आजही तशीच अवस्था पाह्यला मिळते.

गावचा सरपंच हे लोकशाहीतील घटनांत्मक पद रचनेतील सगळ्यात शेवटचे पद असतानाही त्याच्या घरातील चोरीचा तपास लागावा यासाठी पोलिस अधिक्षकांपर्यत जाणारा आणि पोलिस दलातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडून स्वत:चा केलेला गुन्हा दडपण्यासाठी एका निष्पाप आणि निर्दोष आदीवासी व्यक्तीला कोणताही गुन्हा नोंद न करता अटक करणे आणि गुन्हा कबूल करावा यासाठी त्याला मरेपर्यत मारहाण करणे आदी गोष्टींवर चांगलाच प्रकाशझोत टाकला आहे. याशिवाय स्वत:च्या पदोन्नतीसाठी ही कशा पध्दतीने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला जातो याची तीन उदाहरणेही या चित्रपटातील तीन वेगवेगळ्या दृष्यातून दाखविण्यात आले आहे. त्यातील एक स्वत: या प्रकरणाची चौकशी करणारा पोलिस अधिकारी एका व्यक्तीशी फोनवर बोलताना दोन वर्षे झाली पैसे देवून प्रमोशन कधी होणार असा सवाल फोनवरून समोरच्याला विचारतो, तर सरकारी वकील असलेला व्यक्ती प्रत्येक गुन्ह्याकडे किंवा याचिकेकडे कोणत्या नजरेतून पाहतोय, सरकार म्हणून बसलेल्या राजकिय व्यक्तींकडून स्वत:च्या उन्नतीचा मार्ग शोधणाऱ्या राज्याच्या महाधिवक्त्याकडूनच राज्य सरकारची होणारी बेअब्रु वाचविण्यासाठी आणि गुन्हा केलेल्या पोलिसांना लपविण्यासाठी मदत करताना दाखविण्यात आला आहे.

चंद्रू हा व्यवसायाने वकील परंतु तो मुळातला कार्ल मार्क्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तामीळनाडूतील थोर विचारवंत आणि समाजसुधारक पेरियार यांच्या विचारावर चालणारे व्यक्तीमत्व दाखविण्यात आले आहे. एका शाळेतील गॅदरिंग कार्यक्रमाच्या निमित्ताने

प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहीला असता त्याने तो लहान मुलांना महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वेषभुषांमध्ये उभे असलेले पाहतो त्यावेळी चंद्रु शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रश्न करतो, इथे तर महात्मा गाधी, नेहरू प्रमाणे सगळीच महापुरूष दिसत आहेत. पण डॉ. आंबेडकर दिसत नाहीत. या एका प्रश्नाच्या माध्यमातून चंद्रु या नायकाने शाळांपासून किंवा शाळेतील शिक्षकांपासून समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या असलेल्या धारणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

त्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा कोणत्याही जातीत जन्माला आला म्हणून तो खालच्या दर्जाचा आणि वरच्या जातीत  जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ किंवा वरिष्ठ अधिकारी आहे म्हणून तो हुशार किंवा चांगला आणि जो गरीब आहे अथवा कमी दर्जाच्या जातीत जन्माला आला म्हणून तो नेहमीच गुन्हेगार, लालची या सामाजिक नेणीवेत असणाऱ्या अलिखित समजांवरही या चित्रपटाच्या माध्यमातून प्रश्न चिन्ह निर्माण करत शेवटी कोणी कोणत्याही जातीत जन्माला आला तरी तो वरिष्ठ किंवा कनिष्ठ नाही तर तो एक मनुष्य प्राणी असल्याची जाणीव या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याशिवाय आपल्या समाजात या पध्दतीचे दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला पाह्यला मिळत आहेत. अशा पध्दतीची व्यवस्था निर्माण होण्यामागे कळत न कळत आपणच कसे जबाबदार असतो याचे उत्तम उदाहरण, आदीवासीं मुलांना शिक्षण देण्यासाठी जाणारी एक शिक्षिका सरकारी अधिकाऱ्यांना विनंती करते हे ही नागरीक आहेत, त्यांनाही मतदानाचा अधिकार तो मिळाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घ्या. परंतु तो सरकारी अधिकारी त्यांचे नाव मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे टाळतो. तसेच त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे कारण पुढे करतो. तर तेथेच बाजूला बसलेल्या गावातील राजकिय व्यक्तीही आपण खालच्या जातीतील व्यक्तीना आधीच हात जोडून मते मागतोय ही काय कमी गोष्ट आहे का? आता या आदीवासांसमोरही असेच जात जोडायचे का? असा सवाल करत तो त्या आदीवासी महिला आणि त्या शिक्षिकेला हाकलून लावतो.

या पध्दतीची एखादी घटना आपल्या आजूबाजूला कधी तरी कोणाच्यासोबत घडलेली असणारच आहे. पण त्याबाबत आपण कधी आवाज उठवलाय का? तर अनेकांचे उत्तर नाहीच असेच येईल. आपण प्रत्येकानेच उघड्या डोळ्यांनी राजकिय व्यक्तीकडून कधी राजकिय फायद्यासाठी तर कधी वैयक्तीक फायद्यासाठी अशा पध्दतीचे कृत्य करतानाचा अनुभव असणारच आहे. त्याशिवाय आपणही कधी तरी पोलिसांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल करू नये किंवा बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात कारवाई करू नये यासाठी म्हणून पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केलेला असणारच आहे. म्हणजे न कळतही आपण एका अशा लपवाछपवीच्या भ्रष्ट व्यवस्थेला आणि आपल्यासाठी चांगली आणि दुसऱ्यासाठी अडचणीची व्यवस्था निर्माण करण्याच्या गोष्टीला हातभारच लावत आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक प्रसिध्द वाक्य आहे, “जर गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल”. परंतु आताच्या परिस्थितीत आपण प्रत्येकजणच एकमेकांला मानसिक गुलाम कसे राहु यासाठी प्रयत्नशील आहे. व्यवस्थेत घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्याची तसदी घेणाऱ्यालाच शांत बसविण्यासाठी आपल्यातीलच अनेकजण प्रयत्न करताना दिसत असल्याचे चित्र आपल्याला पाह्यला मिळत आहे.

उदाहरणा दाखल काही उदाहरणे पाह्यची झाली तर पुणे, मुंबईसह देशातील अनेक महानगरे आणि शहरांमध्ये विकासकांकडून पर्यावरणाचे नियम किंवा सरकारी नियम पायदळी तुडवित भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या जात आहेत. मात्र त्या स्वस्त दरात असतात म्हणून मग आपणच किंवा आपल्यातील अनेक जण त्या इमारतीतील सदनिका विकत घेण्यासाठी धाव घेतात. मात्र ती इमारत बेकायदेशीर आहे म्हणून आपण त्या विरोधात कोठेही तक्रार करत नाही. आणि केलीच तर त्या विकासकाकडून एकतर तोडपाणी केली जाते किंवा ती तक्रार दाबण्यासाठी राजकिय नेत्यापासून ते प्रशासातील अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत त्या विकासकालाच आपण संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “राजकारण आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून या दोन्ही गोष्टींचा एकत्रित वापर केल्यास लोकशाही धोक्यात येईल” असा इशारा संसदेत राज्यघटनेबाबत बोलताना दिला होता. मात्र मागील काही काळांपासून सर्वच राजकिय पक्षांकडून कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष राजकारणात धर्माचा खुलेपणाने वापर करणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे या गोष्टींना तमाम जनता म्हणून घेणारे आपण सर्वच जण आपल्या जातींच्या अस्मिता घेवून त्या त्या राजकिय पक्षांना मतदान डोळे झाकून करताना आपल्यालाच दिसत नाही.

आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर भ्रष्ट व्यवस्थेने निर्माण केलेली विचारधारांची झापड चढवून घेतली आहेत. त्यामुळे आपल्याला सत्य नावाचे वास्तव ना कधी विचारधारांमधील, ना कधी सामाजिक वातावरणातील ना कधी राजकारणातील वास्तव आपल्याला कधीच जाणवत नाही की कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे चंद्रुचे घर दाखविताना त्याच्या घरातील दर्शनीस्थानी कार्ल मार्क्स ज्याने जगभरातील आर्थिक असमानतेवर आणि कष्टकरी कामगारांच्या हक्काबद्दल भाष्य केले, देशातील ज्या दलित, वंचित आणि शोषित समाजाला आवाज देत धर्माच्या जोखडातून स्वतंत्र होण्याचा मार्ग दाखविणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ज्याने हिंदू धर्मातील थोतांडाविरोधात आणि जातीतील अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे समाज सुधारक पेरियार यांचे फोटो दाखवित विचारांमधील स्वच्छता आणि सुस्पष्टता नायकाच्या व्यक्तीरेखेत असल्याचे दाखवून दिले.

सदृढ लोकशाही आणि निरोगी समाजासाठी आपल्यालाही विचारधारांची सोबत हवी आहे. परंतु आपल्या घरात ज्या महापुरूषांचे फोटो लावले असतील मात्र त्यांनी दिलेल्या विचारांची सुस्पष्टता आपल्यात आहे का? याचे उत्तर कधी तरी आपल्याला स्वत:लाच द्यावे लागणार आहे.

लेखन-गिरिराज सावंत

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *