Breaking News

कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा ! डॉ. प्रदिप आवटे यांनी व्यक्त केल्या कोरोना काळातील भावना

कालच्या ९ मार्चला महाराष्ट्रातील पहिली कोविड केस आढळून २ वर्षे पूर्ण झाली. कोविड पॅन्डेमिक ही मानवी इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. मानव प्राणी हा पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे,असे मानले जाते. अर्थात हे आपलं कौतुक आपण मानवच करत असतो.

कोविड पॅन्डेमिकमधून या बुध्दिमान माणसाने काय बोध घेतला, हे ही या टप्प्यावर समजावून घ्यायला हवे.

मागील दोन वर्षांमध्ये जगभरात साडेचार कोटीहून अधिक लोकांना कोविडची बाधा झाली आणि ६० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू या महामारीमध्ये झाला आहे. आणि अजूनही ही महामारी धड संपलेली देखील नाही आणि या महामारीमध्ये मेलेली माणसे, या महामारीमुळे झालेले आर्थिक नुकसान कमी आहे म्हणून की काय, या बुद्धिमान मानवी जातीतील एक देशाने म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रोज शेकडो माणसे मरत आहेत. आंतरराष्ट्रीय टेन्शन इतके वाढते आहे की जग आण्विक युध्दाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे की काय, अशी भीती वाटते आहे. आता तेलाच्या किमती वाढून जगभरातील आर्थिक व्यवस्था अजून डबघाईस येईल,ते वेगळेच. युनो, नाटो, युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय यंत्रणा प्रयत्न तर करताहेत पण…काहीच सकारात्मक घडत नाही.

कोणता बुध्दिमान प्राणी महामारीच्या काळात असे युद्ध नाहक सूरु करु शकतो? १९१८ च्या स्वाईन फ्ल्यू पॅन्डेमिकमुळे पहिले महायुध्द संपले असे मी अभ्यासले होते. पण यावेळी उलटेच घडले. मागील शंभर वर्षात मानवी बुध्दिमत्तेमध्ये झालेली ही वाढ कौतुकास्पदच आहे.

कोविड महामारीमुळे आपल्याकडील शाळा कॉलेज मागील दोन वर्षापासून बंद होत्या. यामुळे परिघावरील समाजातील खूप मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडली आहेत. उगवत्या पिढीचे भवितव्य यामुळे संकटात सापडले आहे. आपण आपली एक पिढीच महामारीच्या शिक्षणावर झालेल्या परिणामामुळे गमावत असल्याची भीती अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आता कुठं शाळा कॉलेज सूरु होत असताना आपल्याकडे कर्नाटकात हिजाब प्रश्न उपस्थित होऊन त्या वादात शाळा कॉलेज काही काळ बंद ठेवण्याची वेळ आली. वाद एवढा पेटला की त्यात एक तरुण मारला गेला. खरे म्हणजे असे सारे वाद बाजूला ठेवून शाळा कॉलेज सुरळीत सुरु होणे आवश्यक असताना आपण सारेच नको त्या वादात अडकून पडलो. असे वाद सहमतीने सोडवून मुलांच्या शाळा कॉलेज नीट सुरु करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे होते. पण झाले ते भलतेच! महामारीतून आपण शिकतो ते असे आणि तरीही आपण मानव बुद्धिमान ?

युक्रेन युध्दामुळे भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी देशाबाहेर का जात आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न किमान उपस्थित झाला. जसे काही हे आपल्याला पहिल्यांदाच कळाले. कोविड आजाराचे आपल्या देशातील पहिले काही रुग्ण हे केरळमधून वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेली मुले होती. तेव्हा जणू हा विषय आपल्या गावीही नव्हता. आणि आज अचानक हा विषय आपल्या ध्यानी आला. हरकत नाही, देर आये दुरुस्त आये पण आता तरी शिक्षणसम्राटांच्या, कार्पोरेटच्या दावणीला बांधलेले वैद्यकीय शिक्षण आपण मुक्त करणार आहोत का? तशी आपली राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आहे का?

नुकत्याच आपल्याकडे पाच राज्यात निवडणुका झाल्या. कोविड महमारीच्या छायेत या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य या विषयावर साधक बाधक चर्चा होईल ,अशी अनेकांची अपेक्षा होती. पण असे काहीच झाले नाही. या साऱ्या निवडणुकींच्या भाषणामध्ये, माध्यमावरील चर्चेमध्ये, विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये सार्वजनिक आरोग्याचा विषय अपवादानेच चर्चेला आला. एवढ्या मोठ्या आरोग्य विषयक संकटातून आपण जात असताना देखील आरोग्यविषयक भविष्यकालीन नियोजन आपल्या सार्वजनिक चर्चेचा महत्त्वाचा विषय होऊ नये, याला काय म्हणावे ?

गरज सरो वैद्य मरो, अशी म्हण का पडली असावी, असा प्रश्न मला नेहमी पडतो. केवळ वैदयच नव्हे तर गरज संपली की आख्ख्या सार्वजनिक आरोग्याचा विसर आपल्याला पडतो,असे दिसते आहे. आणि तरीही आपण पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिमान प्राणी आहोत, कोई शक ?

सॉरी टू से, पण कोविडने शिकवलेले धडे खरेच आपण मनापासून गिरवतो आहोत का?

हे युद्ध, हे विनाकारण उभे केलेले वाद ,आजही एक समाज म्हणून सार्वजनिक आरोग्याकडे आपण करत असलेले दुर्लक्ष हे पाहिले तर आपण हात जोडून एकच वाक्य नम्रपणे म्हणू शकतो,

कोविड गुरुजी, आम्हाला माफ करा !

– डॉ प्रदीप आवटे.         

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *