Breaking News

पहिली महिला- दुसरा पुरुष राष्ट्राध्यक्षांची पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्षांचे पती यांच्या भूमिकेच्या निमित्ताने बदलाची नांदी: लेखिका- अर्चना शंभरकर

स्त्री पुरुष समानतेच्या सर्व व्याख्या बदलवून टाकणाऱ्या घटना नजिकच्या काळात घडल्या आहेत. पुरुषांची कामे आणि महिलांच्या जबाबदाऱ्या यांचे होणारे पारंपारिक विभाजनही बदलत चालले आहेत. आपण जगत असलेला हा काळ खऱ्या अर्थाने जीवनाला नवे आयाम देणारा काळ आहे. यापुढे अनेक वर्षांनी या काळाचा अभ्यास करतांना काही नोंदी अभ्यासक आवर्जून घेतील. कोरोना सारख्या महामारीने आपल्या जगण्यातील अनेक संदर्भ बदलत गेले. घरातून काम करतांना घरातील कामांकडेही लक्ष दिले जाऊ लागले आणि स्त्रियांसोबतच पुरुषांचाही घरकामातील सहभाग वाढत गेला. परस्पर भूमिकांची वर्षानुवर्ष होत असलेली विभागणी मधील रेषा पुसट होत गेली. घराबाहेरील प्रत्येक कामात ज्या प्रमाणे स्त्रीया पुढाकार घेत आहेत, घरातील सर्व कामांमध्ये पुरुंषाचा सहभाग वाढत आहे.

जागतिक स्तरावरही या बदलत्या परिमानांचे दृष्य स्वरुप आपल्याला अमेरिकेत बदलत गेलेल्या राजकीय घडामोडी मधून दिसून आले आहे. अमेरीकेचे राष्ट्रपती म्हणून जो बायडेन यांनी कार्यभार सांभाळल्या नंतर पहिली महिला (फर्स्ट लेडी) म्हणून डॉ. जिल बायडेन यांना मान मिळाला. तर, पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून श्रीमती कमला हॅरिस यांनी शपथ घेतल्यानंतर दुसरे पुरुष नागरिक (सेकंड जेंटलमन) म्हणून डगल्स एमहॉफ यांना मान मिळाला.

डॉ.जिल बायडेन काम करत राहणार

जो बायडन हे ओबामांच्या राष्ट्रध्यक्षच्या काळात उपराष्ट्रपती होते. त्यामुळे डॉ.जिल बायडेन या यापूर्वी सेंकड लेडी होत्या. आता त्या फर्स्ट लेडी आहेत. असे असले तरी त्यांची स्वत:ची अशी ओळख आहे, आणि त्यांनी ती जपयाची असे त्यांनी ठरवलेलं आहे. डॉ. जिल या विद्यापिठात शिक्षीका आहेत. मुलांना शिकवायला त्यांना आवडत. तो त्यांचा व्यवसाय आहे, ते त्यांचे पॅशन आहे, आणि ती त्यांची ओळखही आहे. आता पर्यंतच्या इतिहासातील तशा त्या सर्वात वयोवृदध फर्स्ट लेडी आहेत. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि व्हाईट हाऊस बाहेर काम करायला जाणाऱ्या त्या विद्यमान आध्यक्षांच्या पत्नी असणार आहेत. यापूर्वी असं कोणी केलं नव्हत. वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांना आपल प्रोफेशन कायम ठेवावे असं वाटणं हे खरे तर कौतुकास्पद आहे. मोठया नेत्यांच्या सावलीत साधारणपणे त्यांच्या सहचरिणीचं वेगळेपण नेहमीच झाकोळलं जातं. अनेक मोठ्या नेत्यांच्या कामाचा व्याप वाढला की घरातून त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी पूर्णवेळ दुसरे काम करत नाहीत. आणि जर एखादीने वेगळी वाट धरलीच तर तिचे मनोघैर्य वाढविण्याऐवजी समाजाकडून खच्चिकरण केल जातं. याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. अमेरिकेतही डॉ. जिल बायडेन यांना त्याचा सामना करावाच लागला.

जो बायडेन यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर चार वर्षांनी जिल यांच्यासोबत विवाह केला. किशोर वयात अत्यंत जिद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल त्यावेळी नुकत्याच आपल्या क्लेषपुर्ण घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होत्या. जो बायडेम यांची एक वर्षाची छोटी मुलगी आणि पत्नी अपघातात दगावले होते. मात्र त्यांची दोन मुलं त्या अपघातातून गंभीर जखमी होऊन वाचली होती. त्यांच्या पालन पोषणाची सावत्र आई म्हणून येणारी जबाबदारी आणि जो यांचे सार्वजनिक आयुष्य या दोन बाबींमुळे जिल यांनी जो यांना होकार द्यायला बराच वेळ लावला होता. ज्या मुलांची जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहणाऱ्या जिल यांना याच मुलांनी ‘सर्वात चांगली सावत्र आई’ असा उल्लेख नंतर केला होता. डॉ. जिल यांचा अभ्यास हा मुलांच्या मानसिकतेशी निगडीत आहे, आणि म्हणून कदाचित त्यांना घरच्या पातळीवर असलेला हा लढा यशस्वी पणे जिंकता आला होता.

‘स्टुडंट्‍स रिलेशन ॲट कम्युनिटी कॉलेज लेवलः मिटींग स्टुडंट्‍स निड्‍स’ या विषयावरील त्यांच्या शोध प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. एवढेच नव्हे तर चार वेळा त्यांना मानद डॉक्टरेट मिळालेली आहे. सन २०१० मध्ये डेलावेरच्या युनिव्हर्सिटी ऑफ डेलावरने त्यांना डॉक्टरेट दिली.  त्यानंतर सन २०११ मध्ये रोड आयलॅड येथिल साल्वे एजिना युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’, सन २०११ मध्येच पेनसेल्वियाच्या मोन्ट गोमेरी काऊंट कॉलेज यांनी  ‘असोसिएट ऑफ लेटर्स’, सन २०१४ ला विलानोवा युनिव्हर्सिटी कडून ‘ डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज’ आणि २०१७ ला न्युयॉर्कच्या हॉफस्ट्रा युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’ असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. असे असले तरी, अमेरिकेतील लोकांनी जिल यांना डॉक्टर असे नामाभिधान लावू नये असे सूचविले आहे. जर आपण वैद्यकशास्त्रातील डॉक्टर नसाल तर नावापुढे ‘ डॉ.’ लावू नका असे वाद निर्माण केले. एखादी महिला जर ती प्रथम महिला असेल तर तिच्यावर माध्यमांचा प्रकाशझोत येणारच , अशा परिस्थितीत तिच्या प्रत्येक कृतीची बारकाईने चर्चाही होणे क्रमप्राप्त आहेच. असे असतांना जिल यांचे वेगळे पण अधोरेखित होणारी बाब म्हणजे त्यांनी आता पर्यंत करीत असलेले काम सुरु ठेवण्याचा निर्धार ही आहे.  आपल्या पतीच्या मोठ्या पदाचा आणि त्याच्या असलेल्या प्रभावामुळे आपल्या जीवनात परिवर्तन न करता कार्यरत राहणा-या जिल यांचे हे निश्चितच वेगळेपण आहे. आपल्या व्यक्तीमत्वाला साजेसे कार्य सातत्याने करता यावे एवढी रास्त अपेक्षा अमेरिकेने मान्य करण्यास हरकत नसावी.

डग्लस एमहॉफ पुर्णवेळ मदत करणार

एमहॉफ डग्लस यांची कमला हॅरिस ही दुसरी पत्नी. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. ५५ वर्षीय डग्लस हे करमणूक उद्योगासाठी ऍटर्नी म्हणुन काम करतात. करमणुक, प्रचार, प्रायव्हसी आणि कॉपी राईट यासाठी सल्ला देतात. सुमारे ४५ कोटी रुपयांची संपत्ती असलेले एमहॉफ यांनी कमला यांच्या प्रचार प्रसिद्धी दरम्यान आपल्या चालू कामातून सुट्टी घेऊन पुर्णवेळ कमला यांच्या कामात स्वःताला झोकुन दिले. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या एक सक्षम नेत्या आहेत. पहिली महिला उपाध्यक्ष, पहिली आशियाई वंशाची महिला यासारख्या बाबींमुळे कमला हॅरिस या सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या कडून अमेरिकेला अनेक अपेक्षा आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रतिमेवरून त्या या अपेक्षांची त्या पुर्तता करतील असे तरी सध्या चित्र दिसत आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी एमहॉफ यांनी पुर्णवेळ कमला हॅरिस यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिली महिला जिल आणि दुसरे पुरुष नागरिक डगल्स  या दोघांनी घेतलेले निर्णय हे त्यांनी घेतलेल्या भुमिकांचे प्रगटीकरण आहे. स्त्री पुरुष कामांची वाटणी आणि जेंडर डिस्क्रीमिनेशन या संदर्भात होत असलेल्या अनेक बदलांची ही नांदी आहे .

-अर्चना शंभरकर

9987037103

 

Check Also

दे–ही शेतकरी… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

कल्पेशने पुन्हा एकदा पेटी उघडली, प्लास्टिकच्या पिशवीत दोन तुकडे झालेलं पासबुक बघितलं. काहीसा विचार केला पुन्हां पासबुक पाहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *