Breaking News

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण नसल्यामुळे आणि आम्ही टोपलं दिलं तरी उचलू या मानसिकतेमुळे कोणी ऑफिसातल्या मऊ गादीवर आपलं हडकुळ बूड टेकवू शकलं नाही. आणि गाव वाले आपल्याला नोकरी मिळाली बाकी ठेकेदार किती घेतो ? काय करतो ? याचं कोणाला काही पडलेलं नव्हतं. महिन्याचे चार हजार कमावताना कपाळाला घाम पुसणारा आता महिन्याला वीस-तीस हजार मिळू लागल्यावर जगात काय चाललय कशाशीच घेणं देणं रहात नाही. गावात असाच रग्या राहायचा त्याला टोपण नावाने फुटूस असे बोलायचे आणि त्याच नावाने ओळखायचे. उंची कमी होती म्हणून अख्या जगाची मस्करी सहन करणारा म्हणून त्याला राष्ट्रपती पुरस्कार नक्की मिळाला असता. फुटूस उंचीने जरी लहान तरी अर्धा गाव त्याला घाबरत असे. प्यायल्यावर त्याच्या तोंडाला कोण लागतं नसे आणि ज्याची गावातल्या गावांत किंवा गावाच्या बाहेर लफडी आहेत असा माणूस तर त्याच्या जवळ देखील उभा राहत नसे. एकतर पिऊन आल्यावर गावभर बडबड करत फिरत असे आणि अख्या गावाची लफडी याच्या जिभेवर, फक्त तो माणूस समोर दिसला रे दिसला की की मोठं मोठ्याने त्याला त्याच्या लफड्याबद्दल बोलायला सुरुवात करायचा. पहिलं पहिलं लोकांना फालतुगिरी वाटायची पण हे सत्य आहे काही दिवसांनी उघड व्हायचं. त्यामुळे कोणीच त्याच्या तोंडाला लागायचं नाही तो एकदा पिऊन आलेला दिसला की स्वतःला मर्द समजणारे सुद्धा चुलीजवळ बायकोला काही मदत हवी का म्हणून पळत असत.

फटूस कंपनीत प्लांबर म्हणून लागला होता. प्लम्बिंग बरोबर गटारात चेंबर मध्ये काही घाण अडकली तर त्यालाच उतराव लागायचं. प्लम्बिंग कमी पण घाणीचा पाईप फुटला, गटार फुल्ल झालं, काही अडकल तर तोच उतरे. अख्या कंपनीतला कुठचा पाईप कुठं फिरलाय आणि त्याचा सांधा कुठाय याची नस आणि नस त्याला माहिती. हल्ली हल्ली त्याला नेहमी गटारात उतराव लागायचं म्हणून नेहमी पिऊन येत असे. त्याचं पिणं अगदीच वाढत गेलं आणि गटारात उतरल्या नंतर बाहेर आल्यावर अख्या कंपनीची आय बहीण काढी. त्याचं हे वागणं बाकीच्यांना कळत होतं. पण कोणी काही बोलेना कारण तो पर्मनंट होता. त्यामुळे कोणी काही बोलेना शेवटी युनियन वाल्यांनी वैतागून त्याची तक्रार केली. पहिली त्याला समन्स देण्यात आला. पण दुसऱ्या दिवशी नेहमी पेक्षा जास्त पिऊन येऊन युनियनची आय बहीण काढली. तेंव्हा मात्र कुठे गंभीर विषय झाला आणि त्याला काढून टाकण्यात आलं.

काढून टाकलं तरी फुटूसला त्याचं जराही दुःख नव्हतं. कारण लोकल लेव्हलला गटारात उतरून घाण काढणारा भेटेल ही पण पायपाच्या चेंबरच्या सगळ्या नाड्या यालाच माहिती होत्या. चार पाच दिवस होऊन गेले फुटूस मस्त सकाळीच सात वाजता किंजलवाडीत दारू प्यायला जायचा आणि दिवसभराची पार्सल घेऊन यायचा. एक कामगार बोलावला होता तो चार दिवसात निघून गेला. आणि जागा निघाली तर घाण उचलायचं कामं कोणी करायला तयार नाही. तो एकतर जातीचा विषय बनला होता आणि दुसरा प्रतिष्ठतेचा बनला होता. त्यामुळे कोणी मिळेना. चेंबर लिकेज होऊ लागले. गटारात  भयानक गाळ साचू लागला. पाईप कुठचा कुठे फुटलाय ते कोणाला कळेना. युनियनवाले ही बोलले फुटूस शिवाय पर्याय नाही.

पण त्याला मनवणार कोण? फुटूसच्या वाडीतला श्रीकांत बोलला मी त्याला मनवतो. श्रीकांत संध्याकाळी फुटूसच्या घरी गेला, फुटूस घरी नव्हता. फुटूसची म्हातारी  आई बोलली ” कुठं फटकीला गावलाय काय म्हाईत बावा येल आता हेपाल घेऊन थांब वायच च्यायचा नकबर घोट घे.

श्रीकांत चहाचे दोन तीन घोट घेऊन झाला असेल तितक्यात फुटूसचा लांबूनच आवाज येताना दिसला, ज्याने कंपनीत तक्रार केली त्याच्या बायकोची कुंडली वाचत येत होता, ” माला कामावरनं काढायची माय ईयाली नाय मला काय रूपाचा लफडा म्हाईत नाय काय मी सोता सोता डोळ्यांन बघितलंय, संध्याकाळी जग्गूचा पोरगा आणि तिला खाणीवर गाडी लावून आतमधी घुसताना बघितलाय. माजा डोसका फिरला त आख्या गावभर करीन”. श्रीकांतला मात्र आता मजबूत घाम फुटला यांनी काठी आपल्यावर फिरवली तर आपला कंदील विजला समजायचा”. फुटूस आला, हातात दारूच्या मोटल्यांची पिशवी, हातात काठी आणि बॅटरी घरात शिरला, “शिऱ्या आज हिकडं कसा लोळवलास? ” मला समजलंय ” इतकं बोलल्याबरोबरच श्रीकांतच्या फिट झाल्या, श्रीकांतने पाणी फुटायच्या आधीच तिथं चिखल चेपला पाहिजे असा श्रीकांतने करून फुटूसला बोलला,  “तुला कामावर बोलावलिन हाय”. फुटूस वैतागला, “बा झवत गेला काम मला मी येत नाय मॅडमला जाऊन सांग, आणि परंत येव नको, नायत तुझी पण कुंडली वाचायला टाइम लागणार नाय मला, “एवढं बोलून पिशवीतली एक मोटली काढून श्रीकांतला दिली. श्रीकांतने आजची आपली सोय झाली म्हणून एक ही शब्द नं बोलता चालता झाला. दुसऱ्या दिवशी नऊ वाजताच कंपनीची गाडी आली आणि दोन कर्मचारी आले होते. कर्मचाऱ्यांनी सांगितलं मॅडमने बोलावलंय. फुटूस जाण्यास तयार झाला. पण कंपनीत जायच्या आधी गाडी किंजलवाडीत वळवायला लावली कर्मचाऱ्यांनी वळवली ही फुटूस ने दोन मोटल्या गटागटा पोटात ओतल्या गाडीत बसल्या बसल्या वास दरदरून गच्च भरला कर्मचाऱ्यांनी एसी बंद करून खिडक्या उघडल्या आणि गाडी कंपनीच्या गेटवरून आत घुसली फुटूसने सिक्यूरीटी वाल्याना सेलिब्रेटी असल्यागत हात दाखवला. सिक्यूरीटी वाल्याने सुद्धा उसने घेतल्यागत मान हलवली. फटूसला आतमध्ये घेऊन गेले, लघवीला जातोय म्हणून पाच मिनिटात एक मोटली मारून आला. युनियनचे पाच सहा जण लोकं, मॅडम फुटूस असे बाईच्या केबिन मध्ये, फुटूसला समोर खुर्ची बसायला दिली

फुटूस मोठा अटीट्युड आणून बोलला, “बोला कोणाचं काय कुठं अडलंय ?” बाई  बोलू लागली, ” हे बघा तुम्ही इथले जुने पर्मनंट कामगार  होतात, त्यामुळे आम्ही बऱ्याचश्या चुका पदरात पाडून घेतल्या पण कंपनीचे काही नियम आहेत. ते पाळावे लागतीलच म्हणून, म्हणून तुम्हाला सस्पेंड केलं. पण या नंतर आम्ही तुम्हाला दिवसभर प्यायची परवानगी देतो, तुम्ही कामावर रुजू व्हा “.फुटूसला आपण कंपनी विकत घेतली आणि बाईने नुकतीच त्यावर सही करून आपल्याकडे सुपूर्द केल्याचा आनंद झाला. फुटूस बाईच्या पाया पडू लागला.

युनियन वाल्यांनी डोक्याला हात लावला. फुटूसने पार्सल आणलेल्या दोन मोटल्या मुतारीत जाऊन गटागटा मारल्या पुन्हां बाईच्या ऑफिसात गेला आणि बाईला विचारलं, “मी आजपासूनचं कामावर रुजू झालो तर चालेल ना? बाई खूष “हो हो काही हरकत नाही”. फुटूस दिवसभर कामं करून जेंव्हा संध्याकाळी घरी निघाला तेंव्हा आपण या कंपनीचे मालक म्हणूनचं जात आहोत या अविर्भावात निघाला. त्या नंतर मात्र फुटूसला कोणी काहीच बोलेना फुटूस राजा माणूस झाला. पण त्याने हा कधीच विचार केला नाही, निदान घाणीच्या जवळ जाण्याची वेळ आपल्यासारख्यांवरचं का येते? गावांत राहून तीस हजार महिना मिळतं असून गटारात उतरणारा माणूस कोणीच का भेटू नये? . अश्या प्रश्नाचे स्वप्न देखील त्याला कधी पडलं नसेल आणि पडणार ही नाही. पण फुटूस हा आता राजा माणूस झाला एवढं मात्र तो स्वतः स्वतःला सांगत राहीला.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *