मागील दोन दिवसापासून सध्याच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करणारा एक व्हिडिओ एका मराठी अभिनेत्रीचा भलताच समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दिवसागणित त्याच्या व्हायरल होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर सध्याच्या राजकिय परिस्थितीचे आणि राज्य सरकार म्हणून राज्यातील नागरिकांसाठी कायद्याप्रमाणे काही निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र त्या विशिष्ट वर्गालाच का १० कोटी रूपयांचा निधी दिला म्हणून त्या मराठी अभिनेत्रीने इतका गळा काढला की, व्हिडिओ पाहणाऱ्यांना सध्या तिच्या उद्विग्न परिस्थितीची किव येऊ लागली.
मात्र सध्याच्या राजकिय परिस्थितीमुळे दोन धर्मातील विखारीपणा ज्या सत्ताधाऱी पक्षाने निर्माण केला. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मात्र कोणतेच भाष्य नाही. मात्र त्या पक्षाची समर्थक असलेल्या या अभिनेत्रीने मात्र तिच्या व्हायरल व्हिडिओ मध्ये फक्त ओक्साबोक्सी रडायचीच राहिली होती. पण क्षणाक्षणाला राज्य सरकारच्या १० कोटी रूपयांचा निधी देण्याच्या निर्णया विरोधात त्या अभिनेत्री सातत्याने होत असलेल्या मानसिक त्रास आणि समर्थक म्हणून असलेल्या भूमिकेबाबत बोलतानाही व्हायरल व्हिडिओत दिसून येत होते.
त्या अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडिओला कवी मनाचे प्रदिप आवटे यांनी दिलेले उत्तर वाचा त्यांच्याच कवितेच्या माध्यमातून…
प्रिय,
मला तुझं नाव आठवत नाही.
तुझी जात, तुझा धर्म.
खरं सांगू मला या संज्ञाच आकळत नाहीत.
खरं म्हणजे आज तुझा व्हिडिओ पाहताना आतून भडभडून आलं.
कुठली विचित्र वेदना तुझ्या डोळ्यांमध्ये भरली आहे हिंदी महासागरासारखी …
मन एखाद्या पाऱ्याच्या गोळीसारखे असते, नाहीं?
कधी हातातून निसटून जातं कुणालाच कळत नाही.
असं निसटलेल्या विस्कटलेल्या मनाला जर द्वेषाची फोडणी मिळाली तर अजूनच शकलं होऊन जातात त्याची!
तुझ्या डोळ्यांत दिसताहेत ते सारे तुकडे..
आपण सगळेच किती विचित्र काळात जगतो आहोत.
तुझं तर वय सुद्धा किती लहान आहे ग..
योग्य काय, अयोग्य काय
हे कळायला वाटतं तितकं सोपं कुठं असतं ?
आपण कोणत्या घरात वाढतो,
आपल्या अवतीभवती कोणती माणसं आहेत ,
आपण काय ऐकतो, वाचतो ,पाहतो
या सगळ्यांनी आपलं आभाळ एकतर काळवंडून जातं किंवा उजळून निघतं !
प्रदूषण हवेचे, पाण्याचं, जमिनीचं
तुझ्या माझ्या जगण्याचं…
काय काय निवडून काढायचं
या मातीतून,या पाण्यातून, या हवेतून
खरंच ग कळत नाही
पोरे,
मला तुझा राग येत नाही.
तुझ्यावर रागवून काय करू ग मी ?
मला कळतं तू आजारी आहेस आणि आजारी माणसाची मला फक्त काळजी वाटते ग!
दुसरं काहीच नाही…
मला तुझी खूप काळजी वाटते.
खूप म्हणजे खूप खूप.
नको ग अशी सैरभैर होऊस वेडू बाई…!
बघ, पाऊस आलाय… थोडी पावसात भिज.
ओल चिंब करणाऱ्या या पावसाला कधीतरी विचार तुझा धर्म कोणता तुझी जात कोणती ?
अग तो हसेल वेड्यासारखा आणि पुन्हा गडगडेल ढगांच्या आडून!
मग तुलाही कळेल,
त्यांनाही कळेल,
धर्म, जाती ,प्रांत या सगळ्याच सीमा,
वेड्या माणसांनी कागदावर ओढलेल्या रेघा आहेत नुसत्या !
कळेल ना ग…
तुझ्या माझ्या सगळ्यांच्या आजारावर एकच उत्तर आहे प्रेम जिव्हाळा माया!
सगळं विसरून एकमेकांना प्रेमानं कवेत घेता आलं पाहिजे.
जगात इतकं सुंदर खरंच काही नसतं.
आग लावणं सगळ्यात सोपं ग !
अंधारात , वादळवाऱ्यात एक छोटीशी समई लावणं खूप अवघड असतं !
ये ग, आपण लावू या ती…खरेच !
ती उबदार ज्योत जपून ठेवण्यात किती मजा असते काय सांगू तुला !
कवी: प्रदीप आवटे