Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “शासनकर्ती जमात बनणे हेच उद्दिष्ट”: मग आजस्थिती काय ? महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम

‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोडय़ाशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठय़ा आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय.’’ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२४ सप्टेंबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रास आताचे चेन्नई पार्क टाऊनमध्ये मद्रास इलाखा शेडय़ुल्ड कास्ट्स फेडरेशनच्या जाहीर सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त करत पुढील चळवळीला एकप्रकारे दिशादर्शन केले.

साधारणत: ७८ वर्षापूर्वी भारतरत्न आणि भारतीय राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आगामी आंबेडकरी चळवळीची दिशा निश्चित केली. मात्र या ७८ वर्षात सुरुवातीची ३ वर्षे जी पारतंत्र्यातील होती. ती जर सोडली तर त्यानंतरच्या काळात म्हणजे आतापर्यत खरंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दिशादर्शनानुसार वंचित, शोषित असलेला मागासवर्गीय आणि दलित समाज शासनकर्ती जमात बनला आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला. तर महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ ला झाले. त्यावेळी ते हिंदू-महार तेव्हाच्या अस्पृश्य जातीत जन्माला आले. तेव्हांची मेट्रिक पास होणारे त्यावेळच्या अस्पृश्य जातीतील ते पहिले विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत उंचच उंच शिखरे पादाक्रांत केली. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावरच ब्रिटीश सरकारच्या मंत्रिमंडळात आपले स्थान निर्माण केले. त्यावेळी मंत्री असतानाही त्यांनी सतत कष्टकरी, अस्पृश्य जातीतील समाजाचा विचार करून त्या अनुषंगाने निर्णय घेतले. परंतु या समाजाचा विचार करून निर्णय घेत असतानाही स्वतंत्र भारतासाठीच्या लढ्याच्या अंगानेही पोषक भूमिका स्विकारली. त्याचबरोबर भारताच्या अखंडतेला कधीही तडे जाणार नाहीत याची काळजीही त्यांनी नेहमीच घेतली.

एकाबाजूला पारतंत्र्यांतील पारतंत्र्यात राहणाऱ्या नागरीकांच्या मुलभूत हक्कासाठी झटत असताना संबध भारतीय नागरीकांच्या हक्कासाठीही ते सजग राहीले. म्हणूनच त्यांच्याबरोबर त्यांनी उभारलेल्या लढ्याला जशी ब्राम्हण जातीतील नागरीकांनी साथ दिली तशी इतर काही उच्चवर्णीय समाजातील श्रीमंत व्यक्तींनीही सोबत दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या सामाजिक-राजकिय लढ्याबरोबरच दुसऱ्याबाजूला त्यांनी सांस्कृतिक लढाही उभारला सुरु केला. त्या लढ्याची सुरुवात त्यांनी १९३० ते ३५ दरम्यान नाशिक येथील येवला येथे केलेली घोषणा “मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही”. या घोषणेपासून सुरु केली. भारताच्या मातीत आपली मुळं शोधताना आपल्याबरोबरच इतर धर्मियांनाही हवा हवासा वाटेल आणि त्यांच्याही मुलभूत हक्काला बाधा निर्माण होणार नाही, देशाच्या अखंडतेवर परिणाम होणार नाही किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन मुलभूत गोष्टींना धक्का लागणार नाही याचा सखोल विचार करून त्या पध्दतीने त्यांनी वैयक्तिक आणि राजकिय-सामाजिक जीवनात ती पाळली व अंगीकारली आणि त्याच विचारातून बौध्द धम्माचा स्विकार केला.

त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी नेतृत्वाची संधी दिलेल्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर होती. परंतु त्यांच्याकडून या गोष्टी झाल्या नाहीत. उलट त्यांच्या पत्रावर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिल्या निवडणूकीनंतर असंख्य तुकडे झाल्याचे सर्वांनाच पाह्यला मिळाले. नंतर याच गटा-तटाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ आणि राजकिय प्रवास जो नेहमीच दिशाहीन राहीला आणि तो आजही सुरु आहे.

त्यावेळी अखिल अस्पृश्य जातीत जन्माला आलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे ज्ञानसाधनेच्या आधारे संपूर्ण भारतात आपल्या लढ्याने साऱ्या भारतवासियांना हिंदू असण्याचा पुरर्विचार करायला लावला. मात्र मागील दोन-तीन पिढ्यांमध्ये शिक्षित झालेल्या मागासवर्गिय समाजाला मात्र अद्यापही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दिशादर्शनाचा मार्ग गवसत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय म्हणावे.

आजस्थितीला पाह्यला गेले तर मागासवर्गीय समाजातील पूर्वाश्रमीचा हिंदू-महार आणि आताचा नवबौध्द आणि शेड्युल कास्ट अर्थात अनुसूचित जाती मध्ये मोडणाऱ्या जवळपास १२० जातींचा एकमेकांशी संवादच राहीला नाही. हा सर्व समाज एकत्रित आणण्यासाठी ना कधी तथाकथित रिपब्लिकन नेत्यांनी प्रयत्न केले ना त्यांचे गट-तट चालविणाऱ्यांनी केले. त्यामुळे या समाजाची ताकदच उभी राहीली नाही. उलट आहे त्या ५०-१०० कार्यकर्त्यांच्या जीवावर प्रस्थापित झालेल्या नेत्यांनी मात्र वर सांगितल्याप्रमाणे डॉ.आंबेडकरांनी केलेल्या दिशादर्शनातील सोयीचा अर्थ काढत स्व:हित पाहण्यात आयुष्य खर्ची घालत आहेत.

राखीव जागा मिळविणे आणि त्या टिकवून ठेवणे ऐवढ्या पुरता आपला लढा नसल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेले असतानाही शिक्षित झालेला आणि त्या शिक्षणाच्या बळावर थोडासा सधन झालेला मागासवर्गीय समाज आजही याच राखीव जागांसाठी भांडताना दिसतो. आणि पुन्हा त्यासाठीच रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.

साधारणत: १९ व्या शतकात दलित साहित्य, दलित पँथर आणि काही वैचारीक चळवळी त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे सुरू झाल्या होत्या. मात्र जसे २० शतक आले तसे या कधी काळी अस्मितांचे, आंबेडकरी चळवळीच्या हुंकार ठरलेल्या लढ्याची प्रतिकं एकदम गायब झाली. बदलत्या परिस्थितीतही यांनी आवाज बदलून स्वत:ला जीवंत ठेवणे या चळवळींना शक्य झाले नाही. सध्या शिक्षणामुळे सुबत्ता आलेल्या काही मागासवर्गीय जातींनी स्वत:ला या चळवळींपासूनच सोडवून घेतल्याने याच समाजात आता आहे रे आणि नाही रे वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले आहेत. त्यामुळे एकाच समाजात असूनही यांच्यातील संवाद संपुष्टात आल्याने ते एकमेकांपासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे या समाजात आता संघटन उरले नाही, की ती राजकिय, वैचारीक आणि सांस्कृतिक ताकद उरली नाही. त्यामुळे आजघडली कोणत्याही एका रिपब्लिकन नेत्याला स्वत:च्या राजकिय ताकदीवर समाजाला एकत्र बांधता येत नाही ना या समाजाला शासनकर्ती जमात बनविता आले. उलट स्वत:ला नेते म्हणवून घेणारेच स्वत:च्या राजकिय फायद्यासाठी प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला जावून आपलीच रोजकिय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहूनही त्याला कोणी अटकाव करण्याचे धारिष्ट दाखवित नाही.

काही वर्षांपूर्वी एका रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाच्या नेत्याशी चर्चा करताना त्यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी सत्तेत असलेल्या प्रस्थापित पक्षांकडून पहिल्या फळीतील नेत्यानंतर, दुसरी, तिसरी फळी जाणीवपूर्वक तयार केली जाते. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या एकाही गटातटात पहिली फळी तयार होते आणि ती तिथेच संपते असे का ? असा प्रश्न उपस्थित केला. परंतु त्या नेत्याने फक्त यावर आपण पुन्हा बसून बोलू इतकेच उत्तर दिले. यावरून हे नेते सुध्दा किती भविष्यशुन्य राजकारण करतात हे दिसून आले.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु या ७५ वर्षात अनेक राजकिय पक्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कामाचे त्यांच्या बुध्दीमान असण्याचे गोडवे गात वर्षानुवर्षे मागसवर्गीय समाजाची मते मिळविली. परंतु तशी समांतर व्यवस्था ना रिपब्लिकन पक्षाच्या गटा-तटांना उभी करता आली ना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आली. बिचारे काही कार्यकर्त्ये कधी कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारावून जात त्याप्रमाणे कृती करण्याचा, चळवळ उभारण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रस्थापित असलेले नेतेच त्या कार्यकर्त्यांना प्रसिध्द दलित लेखक बाबूराव बागूल यांच्या कांदबरीतील नायकाची जशी वैचारीक आणि राजकिय “कोंडी” केली तीच अवस्था कार्यकर्त्यांची करतात.

या परिस्थितीला फक्त रिपब्लिकन चळवळीतील नेतेच जबाबदार आहेत असे नाही तर त्यासाठी प्रस्थापित राजकिय नेते आणि त्यांचे पक्षही तितकेच जबाबदार आहेत. पण आता गरज आहे ती आंबेडकरी चळवळीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या दिशादर्शनाच्या वाटेवर एखाद्या व्रंस्थतापणे चालण्याचा निश्चिय केल्यास तो दिवस दूर नाही की मागासवर्गीय समाज शासनकर्ती जमात झाल्याशिवाय राहणार नाही.

लेखन-गिरिराज सावंत  .

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *