फार फार वर्षा पुर्वीची गोष्ट आहे… आमची नानी आम्हाला कोणतीही गोष्ट सांगतांना या वाक्यानेच सुरूवात करायची. आणि या वाक्यानंतर एका अद्भूत आणि अनाकलनीय अशा गोष्टींचा खजीना उघडत जायचा. यात कधी राजाचे प्राण पोपटात असायचे, तर कधी सात समुद्र, सात डोंगर भाषेची, प्रवासाची किंवा गुगल मॅपची अशी कोणतीही अडचण न येताही पार करून राजकुमार राजकन्येसाठी गुलबकावलीचं फुल आणायचा. मध्ये वाटेत येणारे राक्षस विमानाशिवाय हवेतून उडायचे. आतासारखे फोन नसतांनाही शकुंतलेला राजा गावात आला आहे ही बातमी पोहचायची.
ज्या वेगाने गोष्टी बदलत आहेत, तेव्हा आता थोड्या दिवसांपूर्वीच्या घटनांबाबतच आपल्याला अप्रुप वाटू लागलं आहे. ‘न्यु नॉर्मल ’ म्हणून जगाने बदल स्विकारायला सुरूवात केली आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी स्पायडरमॅन, सुपरमॅन हे आपली ओळख पटू नये म्हणुन तोंडावर मास्क लावत असत. गंमतीचा भाग सोडला तरी, अगदी कॅन्सर वगैरे सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक केवळ घराबाहेर पडतांना तोंडावर मास्क लावून फिरायचे. अशी एखादी व्यक्ती दिसली की त्याची किव वाटायची. आज सर्वत्र मास्क लावून फिरणारे लोक बघायची सवय झाली. ‘न्यु-नॉर्मल’ ला आपण सरावत जातो आहोत याचे हे एक उदाहरण आहे.
कोविड आजाराने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. आर्थिक सामाजिक, आणि मानसिक पातळीवर याचे दृष्य परीणाम जाणवू लागले आहेत. संपुर्ण जगाचीच अर्थव्यवस्था ढासळली आहे. वैयक्तिक स्तरावर आर्थिक स्त्रोत कमी झाल्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण आले आहे. निसर्गापुढे सर्व समान आहोत याची जाणिव यामुळे झाली आहे. आपल्या माणसांची किंमत कळायला लागली आहे. स्वःताची काळजी घेणे याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाऊ लागले आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिल्याने वर्षभर छोट्यामोठ्या कुरबुरींसाठी सारखा धरला जाणारा दवाखान्याचा रस्ता ही आता कमी झाला आहे. अगदी सगळे निरोगी झाले असे नाही, तर काही प्रमाणात प्रतिकार शक्ती वाढली असल्याचे हे द्योतक आहे असे जाणकारांचे म्हणने आहे.
न्यु नॉर्मल कसे असेल याविषयी जगभरातील लोकांची काय मते आहेत हे सायन्स न्युज या वृत्तपत्राने जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. ‘ द ग्रेट इन्फ्लुएन्झाः द स्टोरी ऑफ डेडलीएस्ट पॅनडेमिक इन हिस्ट्री’ या पुस्तकाचे लेखक आणि इतिहास तज्ञ जॉन बॅरी यांच्या मते, येत्या सहा महिन्यांत जे घडेल त्यावर भविष्यातील परिणाम काय असतील याचा अंदाज येईल. या वरिल येणारी लस जर प्रभावी असेल, लोकांची प्रतिकार शक्ती टिकून राहिली, उपचार योग्य होत राहिले,स्वस्त आणि लवकर परिणाम दर्शविणाऱ्या प्रतिजैविक चाचण्या होत राहिल्या तर लोक सुरक्षित राहतील. असं ते म्हणतात.
श्री. बेरी यांच्या मते यापुढे लोक अधिक प्रमाणात घरून काम करण्यावर भर देतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खासगी वाहनांचा वापर वाढेल, गृहनिर्माण क्षेत्रातही बदल होऊ शकतील. स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग आणि एकमेकांसोबत संपर्क फारसा येणार नाही अशा प्रकारची घरं तयार होऊ लागतील.
जॉन बेरी याच्या म्हणण्याप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रात बदल होणार असेल तर त्यासाठी भारतातील मुंबई सारख्या शहरात जागेची अडचण कशी दूर करणार हा देखिल मोठा प्रश्न आज समोर दिसतो आहे. त्याच प्रमाणे एकाच घरात राहणारे संयुक्त कुटुंब असेल तर, एकाच वेळी प्रत्येकाची प्रायव्हसी जपत घरातून काम करणे शक्य व्हावे यासाठी आता झोपण्याची खोली बरोबरच काम करण्याची खोली प्रत्येकासाठी वेगळी करावी लागेल.
लॉकडाऊन मधे गावी गेलेले लोक आता पुन्हा परत येऊ लागले असले तरी अजूनही काही क्षेत्रात वर्क फ्रॉम होमची मुभा असल्याने अनेक लोक स्वगावी राहून काम करत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपली भाडे तत्वावर घेतलेली कार्यालय बंद केली आहेत. मोठ्या प्रमाणात द्यावे लागणारे भाडे त्यामुळे वाचले आहे. कार्यालयात वापरली जाणारी, वीज, पाणी आणि इतर संसाधनांची यामुळे बचत झाली आहे. प्रवासाचा वाचलेला वेळ आणि प्रवासामुळे होणारी शारिरिक झिज कमी झाल्याने कामातील गुणवत्तेमध्ये फरक पडला असल्याचे मत काही कंपन्यांनी नोंदविले आहे. अमेरिकेतील अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांनी आपल्या अभियंत्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. असं करित असतांना, घरातून काम करण्यासाठी लागणारे वातावरण आहे किंवा नाही हे कंपनी आधी तपासून घेत आहे. घरात काम करण्यासाठी आवश्यक असणारे टेबल खुर्ची, संगणक, उत्तम वेग असलेले इंटरनेट, यासारख्या गोष्टींची उपलब्धता कंपनी मार्फतच करुन देण्यात येते आहे.
न्यु नॉर्मल मध्ये कार्यालयात काम करण्याचा एकुण पद्धतीतही फरक पडला आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता प्रत्येक कंपनीमध्ये काम करत असलेल्या व्यक्तीची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या कंपनीवर आली आहे. सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता आणि वारंवार हाथ धुणे ही बाब आता केवळ व्यक्तीगत न राहता सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची ठरली आहे.
यापुढच्या पिढीला आजी म्हणून जेव्हा गोष्ट सांगायची वेळ येईल तेव्हा खुप खुप वर्षापुर्वी असं.. न सांगताही नवीन आणि अद्भभूत वाटतील अशा गोष्टी सांगता येतील. या गोष्टींमध्य आता असे उल्लेख येतील, पुर्वी सर्व लोक काम करायला कार्यालयात जात. घरातील लग्न कार्याला हजारोच्या संखेंने लोक येत असत, तोंड हे खासगी अवयव नसून त्याला मास्कने न झाकता समोरच्या व्यक्तीच्या हृदयात एका स्मितने सरळ जाता यायचे. मुलगी हसली की फसली असं ‘त्या’ काळी समजलं जायचं.. आता मुलगी हसली काय आणि रुसली काय.. तिने पाठवलेला टेक्स्ट चेक केल्या शिवाय कळायचं नाही.
आजीने नातवाला कथा सांगणे हे स्टोरी टेल सारख्या ॲप मुळे न्यु नॉर्मलच्या व्याख्येत बसेल किंवा नाही हे पण आताच सांगता यायचे नाही.
***
अर्चना शंभरकर
[email protected]
