Breaking News

विधानसभेत पटोलेंंच्या सूचनेने फडणवीसांना झाली मदत महाविकास आघाडीलाच आणले अडचणीत

मुंबईः विशेष प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्या घराजवळ जीलेटीनच्या कांड्यानी भरलेली स्कॉरपीओ गाडी आढळली. त्या गाडीच्या मालकाचा आज मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सकाळी आढळून आल्याने या प्रकरणातील गुढ वाढल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत याप्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी विधानसभेत केली. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते नाना पटोले यांनी भीमा कोरेगांवचा तपास जसा एनआयएने स्वतःहून घेतला तसे तुम्ही केंद्राला सांगा आणि त्यांना करायला सांगा अशी स्पष्ट सूचनाच फडणवीसांना केली. त्यामुळे याप्रकरणाचा तपास आता एनआयएकडे नेणार असल्याचे सांगत फडणवीसानी जाहिर केले.

विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे अंबानी स्फोटकप्रकरणातील गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा आज सकाळी अचानक मृतदेह रेती बंदर येथे आढळून आल्याची माहिती विधानसभेत दिली. यामुळे याप्रकरणातील गुढ वाढले असून पोलिस अधिकारी सचिन यांचा आणि हिरेन यांच्यात यासंदर्भात चर्चा असल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत करावी अशी मागणी केली.

त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या शरीरावर कोणत्याही स्वरूपाचे मारहाणीचे आणि जखमांचे निशाण आढळून आलेले नाहीत. ठाणे पोलिसांकडून मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे सत्य बाहेर येईल. तसेच सदरची गाडी हि हिरेन यांची स्वतःची नव्हती. त्या गाडीचा मालक वेगळा होता असे स्पष्ट केले.

गृहमंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने फडणवीस यांनी हिरेन याने पोलिसांमध्ये दिलेला जबाबच वाचून दाखवित सदरची गाडी स्वतःची असल्याची माहिती जबाबात दिल्याचे सांगितले. तसेच त्या गाडीचे स्टेअरिंग जॅम झाल्याने हिरेन यांने ती गाडी तिथेच सोडून क्रॉफर्ड मार्केटला गेले. तेथे ते एका व्यक्तीला भेटले. त्याची माहिती ज्या ओलाच्या गाडीत बसून गेले त्या गाडीच्या ड्रायव्हरनेही पाहिल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी हिरेन आणि वाझे यांच्यात फोनवरून बोलणे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणातील सचिन वाझे यांचा संबध होता की काय असा प्रश्न उपस्थित होते.

त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला आत टाकले म्हणून सचिन वाझेवर तुमचा राग आहे का? असा सवाल करत म्हणून तुम्ही सारखे सचिन वाझेचे नाव घेताय का? प्रश्नही उपस्थित केला.

त्यावर भाजपाचे आशिष शेलार, फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही सचिन वाझे हा काळा की गोरा हे सुध्दा पाहिलेले नाही. त्याला आम्ही घाबरत नसल्याचे सांगत केवळ याप्रकरणाचा निश्पक्ष तपास व्हावा यासाठी हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात यावे अशी मागणी केली.

यावेळी अनिल परब यांनी बोलताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस, ठाणे पोलिसांकडून सुरु आहे. तुम्ही गृहमंत्री होतात पोलिसांच्या विश्वासावरच तुम्ही राज्य चालविले ना मग आता त्यांच्यावर का विश्वास ठेवत नाही असा सवाल केला.

त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले हे बोलायला उभे रहात म्हणाले की, ज्या पध्दतीने भीमा कोरेगांवचा तपास तुम्ही एनआयएकडे वर्ग करून घेतला. त्या अनुशंगाने याही प्रकरणाचा तपास तुम्ही केंद्राला सांगून एनआयएकडे मागवून घ्या. उगीच कशाला इथे आवाज करताय असा सल्ला त्यांनी फडणवीसांना दिला.

त्यावर फडणवीस यांनीही नाना पटोले तुम्ही खरेच आमचे मित्र आहात. तुमची योग्यवेळी आम्हाला मदत होते. आताही तुमचीही मदतच झाली असून आता आम्ही तसेच करतो असे स्पष्ट करत एनआयएकडे आपण यासंदर्भात मागणी करणार असल्याचे जाहिर केले.

पटोलेंच्या या वक्तव्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे दिसून आले.

अखेर उशीराने मनसुख हिरेन आणि अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान सभेत जाहिर केले.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *