Breaking News

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, उष्माघाताने ७ ते ८ जणांचा मृत्यू एमजीएम रूग्णालयात झाला मृत्यू, मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश

मागील वर्षीचा २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज सकाळी खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावित आणि तब्बल महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देत जवळपास लाखो लोकांच्या उपस्थित ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाला सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत बसून राहिलेल्या श्री परिवारातील काही जणांना कार्यक्रमानंतर उष्माघाताचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळ पर्यंत ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्याने हा पुरस्कार वितरण सोहळ्याला गालबोट लागले.

या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. पण, आज ४२ अंश सेल्सियस तापमान असल्याने पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. त्यामुळे अनुयायांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत चौकशी केली.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली होती. त्यात सात ते आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. अनुयायांवर चांगले उपचार देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.

यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अतुल लोंढे ट्विट करत म्हणाले, सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवला होता. या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ट्विटच्या माध्यमातून करण्यात आली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *