Breaking News

सत्ता मिळाली की सर्वकाही करेन… ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

नांदेड: प्रतिनिधी

सत्ता आल्याशिवाय मी काहीच करणार नाही महाराष्ट्रासाठी…मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन… सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण चार महिन्यात देतो असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारल्यावर जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का? असा सवाल करतानाच सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार नाहीतर नाही असा जो फडणवीस यांचा हट्ट आहे हे योग्य नाही. असे वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी केलेले नाही याची आठवण करुन देत भाजपला सत्तेत येण्याची गरज नाही कारण राज्यातील जनतेने त्यांना नकार दिल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज कळवळा निर्माण झाला आहे. मात्र यांच्यामुळे भुजबळसाहेबांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले. एकनाथ खडसेसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही असा प्रयत्न भाजपकडून झाला. ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप करत भुजबळांनी भाजपकडे सोल्युशन काढण्याची विनंती केली आहे. पण फडणवीस काय म्हणतात मला सत्ता द्या… चार महिन्यात प्रश्न सोडवतो. म्हणजे सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का? असा सवालही त्यांनी केला.

अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल

राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो. त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

NIA ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो. परमवीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कुणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्र सरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता

जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च झाला मात्र त्याचा रिझल्ट आला नाही. कामाचा दर्जा तर एकदम तकलादू होता असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले.

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करावी अशी मागणी सव्वा वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू असावी. जलयुक्त शिवार योजनेत ७२ टीएमसी पाणी अडवल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु ७२ टीएमसी पाणी म्हणजे एका धरणाचे पाणी आहे. मात्र त्यांनी सांगितलेली परिस्थिती तशी नाहीय. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत लोकं समाधानी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *