Breaking News

केंद्रातील भाजपा सरकारला फडणवीसांनी दिला घरचा आहेर लॉकडाऊनमुळे लोकांचे कामधंदे बंद झाल्याची कबुली

मुंबईः विशेष प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक नागरीकांचे काम-धंदे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची स्पष्ट कबुली राज्यातील भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत असल्याचे किंवा अनेकांचे रोजगार गेल्याने नागरीकांसाठी कोणत्याही पध्दतीचे पॅकेज देण्यास एकाबाजूला केंद्रातील भाजपा सरकार टाळाटाळ करत असताना दुसऱ्याबाजूला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे कबुल केल्याने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गरवारे क्लब येथे सर्व विरोधी पक्षांच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिपाईचे अविनाश महातेकर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांकडे पैसे नसताना वीज भरली नाहीत म्हणून महावितरणने ३ लाख ५० हजार नागरीकांची वीज जोडणी कापली तर ७५ लाख जणांना नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरीकांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लाचार राज्य सरकारकडून तथाकथित अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यानिमित्ताने राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानासाठी आम्ही हजर राहणार होतो. परंतु यावेळी राज्य सरकारने चहापानाचा कार्यक्रमच ठेवला नाही. त्यामुळे चहापानासाठी जाण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेच्यावेळी कोरोना नसतो, काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी कोरोना नसतो फक्त विरोधकांच्या आणि अधिवेशनकाळातच कोरोना असल्याचे सांगत सरकारला कामकाज आणि चर्चा करण्याची इच्छा नसल्यानेच कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकार पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंदूहृदयसम्राट स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वा.सावरकरांसाठी कोणतेही बलिदान द्यायला तयार होते. मात्र त्यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होवूनही केवळ काँग्रेसच्या नादाला लागून स्वा.सावरकर यांची जयंती असून त्यांना अभिवादन केले नाही की त्यांच्या अभिवादन करणारे ट्विट केले नाही. सत्तेसाठी शिवसेना इतकी लाचार झाल्याची टीकाही त्यांनी केला.
त्यामुळे माझा शिवसेनेला एक सल्ला असून भलेही तो घेतला नाही तरी आम्ही देणार असे सांगत सत्तेच्या लाचारीसाठी काँग्रेसच्या नादीला लागून किमान स्वा.सावरकरांचा अपमान करू नका असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राज्यातील अधिवेशनाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी राजीनामा न दिल्यास दिक्षा कायद्याच्या समितीतून भाजपाचे सर्व आमदार राजीनामा देवून बाहेर पडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याप्रकरणात भाजपा ढिलाई करत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला असता फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात संबधित महिलेने माघार घेतली असली तर भाजपाकडून आग्रही मागणी आजही करण्यात येत आहे. तसेच मेहबुब शेख प्रकरणातही भाजपा कोणत्याही पध्दतीची तडजोड करत नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
त्याचबरोबर कोविड काळात या सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून हा भ्रष्टाचाराचा मुद्दाही भाजपाकडून विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *