Breaking News

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित / रसायनशास्त्र / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ जीवशास्त्र / इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट / ॲग्रिकल्चर/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/बिझनेस स्टडीज/ एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना पदविका प्रवेश

महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना संबंधित “उमेदवार विवादित सीमा क्षेत्रामधील आहे”, असा उल्लेख असणारे प्रमाणपत्र जोडावे लागत होते. अशा उमेदवारांना वरील प्रमाणपत्र कर्नाटक राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त करुन घेताना “विवादित सीमा क्षेत्रामधील” या शब्दामुळे अडचणी येत होत्या. आता शासनाने या प्रमाणपत्रातील “विवादित” (Disputed) शब्द काढून टाकलेला आहे. त्यामुळे सीमा भागातील विद्यार्थ्यांस प्रवेश घेणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मिरी पंडित / काश्मिरी हिंदू कुटुंबे (निवासी) कुटुंबियाच्या पाल्यांचा

पदविका प्रवेशामध्ये समावेश

पदविका शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी  विस्थापितांबरोबरच, काश्मीरमधून विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडित / काश्मिरी हिंदू कुटुंबे (निवासी) आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या जागा

थेट द्वितीय वर्षाच्या रिक्त जागांमध्ये ग्राह्य धरण्याबाबत तरतूद

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या ज्या प्रथम वर्षाच्या आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित जागा रिक्त राहतील अशा जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठीही ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहतील. त्यामुळे ईडब्ल्यूएससाठी द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठींच्या जागांमध्ये वाढ होईल.

 प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नाही

१० व १२ वीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना १० व १२ वीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्क ) समिती गठीत

महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन ) अधिनियम -२०१५ नुसार समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विजय लखीचंद आचलिया अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले, सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पुढील पाच वर्षासाठी नियुक्त करण्यात आली आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *