Breaking News

निवडणूक निकाला आधीच काँग्रेस घेतेय खबरदारी वरिष्ठ नेते पाठविले चार राज्यांमध्ये

गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. मात्र हा मतदानाचा टप्पा संपण्याआदीच काँग्रेसने मागील काही वर्षांमधील घडामोडींमधून धडा घेत सावध पावले आधीच उचलण्यास सुरुवात केली असून आधीप्रमाणे अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाला बसलेला फटका आणि हातची सत्ता जाण्यासारखे प्रकार यंदा काँग्रेसला टाळायचे आहेत. त्यासाठीच काँग्रेसने मागील महिन्याभरामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये मतदान झाले त्या ठिकाणी आपले महत्वाचे नेते पाठवले आहेत. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश वगळता पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसने आपले वरिष्ठ नेते पाठवले आहेत.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे नेते पक्ष हिताच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेऊ शकतील या दृष्टीकोनातून या चार राज्यांमध्ये पाठवल्याचं सुत्रांनी सांगितले. हे नेते त्रिशंकु किंवा थेट बहुमत नसलेल्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी किंवा समविचारी पक्षांसोबत युती करण्यासंदर्भातील निर्णयही घेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भातील बैठक काही आठवड्यांपूर्वी घेतली. त्यामध्येच अशाप्रकारे निकालांच्या आधीच महत्वाचे नेते राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजत असून विशेष म्हणजे अशाप्रकारे काँग्रेसने यापूर्वी कधीही आपले नेते निकालाच्या आधीच राज्यामधील राजकीय समिकरणं बांधण्याच्या दृष्टीने पाठवलेले नव्हते.

गोव्यामध्ये २०१७ साली सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. भाजपाने तातडीने निर्णय घेत अपक्ष तसेच समविचारी पक्षांना एकत्र करत सत्ता स्थापन केली होती. सर्वात मोठा पक्ष असणारा काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून पाच वर्षे काम करत होता. हाच गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून यावेळी काँग्रेसने आधीपासूनच तयारी केली.

२०१७ मध्ये काँग्रेसने ४० पैकी १७ जागा गोव्यात जिंकल्या होत्या. भाजपाने १३ जागा जिंकल्या होत्या. मात्र भाजपने छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. दोन वर्षानंतर १५ काँग्रेसचे आमदार भाजपामध्ये गेले. बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार भाजपात गेले. या मोबदल्यात बाबू कवळेकर यांना भाजपाने उप-मुख्यमंत्रीपद दिले. अशा पध्दतीचा धोका होवू नये यासाठी काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसने गोव्यातील उमेदवारांना राहुल गांधीसोबत राहण्याची शपथही दिली होती. मात्र सत्तेची स्पर्धा असताना या अशा शपथेचा फायदा होत नाही असा विचार करुन काँग्रेसने आता वरिष्ठ नेत्यांना राज्यामध्ये निकालापूर्वीच पाठविण्याचा निर्णय घेतला.  आधीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर पटापट निर्णय घेऊन सत्ता काबीज करता येईल असा काँग्रेसचा विचार आहे.

गोव्याबरोबरच काँग्रेसने पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही नेते पाठवले आहेत. या चारपैकी किमान दोन राज्यांमध्ये तरी सत्तेत येईल अशी अपेक्षा पक्षाला आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *