Breaking News

बोम्मईंशी नेमकं कोण बोललं? उपमुख्यमंत्री फडणवीस की, मुख्यमंत्री शिंदे फडणवीस म्हणतात बोम्मईंशी मी बोललो, पण बोम्मई म्हणतात मुख्यमंत्री शिंदेंनी फोन केला

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अचानक उफाळून आला. त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला चिथविणारी वक्तव्ये आणि महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याचे सातत्याने राज्यातील जनतेला पाह्यला मिळाले. तसेच कर्नाटकातील कन्नड राष्ट्र वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. अखेर या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी बोलल्याचे जाहीररित्या सांगितले. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनीच ट्विट करत २१ तासापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली. तर दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे सीमावादप्रश्नी नेमकं कोण बोललं असा प्रश्न निर्माण होत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील २८ गावे कर्नाटकात घेणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सोलापूर आणि अक्कलकोट आम्हाला द्या अशी मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सीमावादावरून वातावरण तापू लागले. त्यातच कर्नाटक सरकारने नियोजित महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांचा बेळगांवचा दौरा असताना या दौऱ्याला बंदी आणणारे आदेश जारी केले. त्याचबरोबर बेळगांवी येथून २८ किलोमीटर अंतारवर असलेल्या टोल नाक्यावर कन्नड राष्ट्रवेदीकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करत नुकसान केल्याने या सीमावादात तेलच ओतले गेले.

यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी या हल्ल्याच्या विरोधात बोलणं झाल्याची माहिती जाहिर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला २४ तासाचा अल्टीमेंटम दिल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपणही बोम्मई यांच्याशी बोललो असून शरद पवारांना कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही. याशिवाय कर्नाटक मुख्यमंत्र्यांबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचे वृत्तवाहीन्यांशी बोलताना सांगितले.

मात्र काल रात्री उशीरा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास फोन केला असून दोन्ही राज्यात शांतता राखणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यावर एकमत झाल्याची माहिती दिली.

बोम्मई यांच्या ट्विटनंतर बोम्मईंशी नेमकं कोण बोललं असा प्रश्न विचारला जात असून याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यालयाकडून का दिली गेली नाही असा सवाल निर्माण होत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *