Breaking News

वादा २० लाख घरांचा, पण प्रत्यक्षात तयार ३ हजार ८०० खाजगी विकासकांची घरे शासनाच्या यादीत दाखवून आवास योजनेची आकडेवारी फुगविण्याचा प्रकार

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच राज्य सरकारने सुरु केलेल्या विकास कामांचे ढोल वाचविण्यास सुरुवात केली. या विकासकामातंर्गत २०२२ पर्यंत राज्यात २० लाख घरांची उभारणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत आतापर्यत ५ लाख घरे उभारल्याचेही त्यांनी वेळोवेळी जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात मुंबईसह राज्यात फक्त ३ हजार ८४७ घरांचेच काम पूर्ण झाले असून अद्यापही १९ लाख ९७ हजार घरांचे काम अद्याप सुरू आहे. तर आजस्थितीत १३ लाख घरांचे काम अद्याप सुरुच झाले नसल्याची धक्कादायक माहिती नुकतीच मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्या हाती आली आहे.
सर्वांसाठी घरे ही योजना राज्यात साधारणतः तीन वर्षापूर्वी जाहीर करण्यात आली. त्यानंतर या योजनेंतर्गत घरांची कामे जलदगतीने पूर्ण होवून त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. परंतु त्यातील वर्ष- दोन वर्षे गृहनिर्माण योजना तयार करण्यातच घालविली. त्यानंतर तरी या योजनेचा शुमारंभ होईल अशी आशा राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाली होती. तरीही ही योजना सुरु झाली नाही. उलट पक्षी गतवेळच्या सरकारने बीएसयुपी अर्थात शहरी आवास योजना, जेएनएनयुआरएम या योजनेंतंर्गत बांधण्यात आलेली घरे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगण्यास सुरुवात केल्याचे मंत्रालयातील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यातील विविध जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेखालील घरे बांधण्यास जमिन उपलब्ध होत नसल्याने या योजनेतील घरे दाखविण्यासाठी राज्य सरकारकडूनच राबविण्यात येत असलेल्या शबरी, वाल्मीकी आवास योजना आदी योजनेतील घरे दाखविण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यपरिस्थितीत राज्य सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेखाली ३ हजार ८४७ घरे तीही पुणे, मुंबईतील एसआरए योजनेखाली आणि श्रीरामपूर येथे बांधून पूर्ण झालेली घरे दाखविण्यात आली आहेत. तर खाजगी विकासकांनी त्यांच्या बांधकाम प्रकल्पातील घरांची विक्री व्हावी यासाठी २ लाख ५० हजार रूपयांची सवलत देत असल्याचे दाखवित त्या घरांची पंतप्रधान आवास योजनेखाली विक्री केली. अशा विक्री केलेल्या घरांची संख्या १ लाख ६१ हजार ८४३ आहे. विशेष म्हणजे अशी खाजगी विकासकांची घरेही राज्य सरकारने या योजनेत दाखविली आहेत. याशिवाय मागील महिन्याअखेरपर्यंत ११ लाख ५४ हजार ६९३ घरांच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पास राज्य आणि केंद्र सरकारने मंजूरी दिली. तर चालू महिन्यात १ लाख ७७ हजार ८७७ घरांच्या निर्मितीस मंजूरी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत राज्यात जर पंतप्रधान आवास योजनेखाली फक्त ३ हजार ८४७ घरे बांधून तयार झालेली असतील आणि मंजूर १३ लाख ३२ हजार ५७० घरे आगामी तीन वर्षात कशा पध्दतीने बांधून पूर्ण होणार असा सवाल निर्माण होत असून कि फक्त खाजगी विकासकांनी बांधलेली घरे स्वतःच्या नावावर दाखवित पाठ थोपटून घेणार अशी उपरोधिक खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Check Also

आतंरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये या भारतीय शैक्षणिक संस्थाचा समावेश

एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसात जगभरातील विद्यापाठांची QS ने जागतिक क्रमवारी जाहिर केली असून या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *