Breaking News

न बोलवताच २७ सप्टेंबरला स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नसल्याची शरद पवारांची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी
राज्य शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक संचनालयाने अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्या विषयीची माहिती कळाल्याने ईडीला तपासात सहकार्य करण्यासाठी स्वतः २७ सप्टेंबरला ईडीच्या कार्यालयात जावून ते जे देतील तो पाहुणचार स्विकारणार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
निवडणुकीच्या प्रचाराला महिनाभर मुंबई बाहेर राहणार आहे. त्यामुळे मी स्वतः दिनांक २७ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार हेमंत टकले उपस्थित होते.
काल संध्याकाळपासून पत्रकारांकडून ईडीची माहिती कानावर आली. शिखर बॅंक केस दाखल केली. त्यात माझं नाव आहे. हा माझ्या आयुष्यातील दुसरा प्रसंग आहे. जळगाव ते नागपुर अशी दिंडी काढली होती, त्यावेळी अटक केली होती. आणि आता हा दुसरा प्रसंग असल्याचे सांगत आता असं समजतं ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयासंदर्भात शोध घेणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जवळपास एक महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार असून मुंबईच्या बाहेर राहणार आहे. ईडीला प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल तर मी उपलब्ध नाही असं होवू नये, त्यांचा गैरसमज होवू नये असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
फुले, शाहुंच्या विचाराने चालणारे आम्ही आहोत. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्यावर विश्वास ठेवणारा मी आहे.
महाराष्ट्र राज्य हे छत्रपतीचे राज्य म्हणून ओळखले जाते. आमच्या लोकांवर तसे संस्कार झाले आहेत. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची शिकवण आम्हाला शिकवली नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खोलात जावू इच्छीत नाही. राष्ट्रवादीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे अशी अनेकांना शंका येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या बँकेच्या संचालक पदावर भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काहीजण होते. राज्य शिखर बँकेच्या संचालक पदावर मी कधीही नव्हतो तसेच बँकेचा मी सभासदही नाही. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे मी स्वागतच करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यावर गुन्हा कसा दाखल झाला—–
राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महानंद शासकिय दूध डेअरीला डबघाईला आणणाऱ्या तत्कालीन व्यवस्थापकिय संचालक शिवाजी तळेकर यांचे लहान वकिल बंधू यांनी राज्य शिखर बँकेत घोटाळा झाल्याची मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. या याचिकेत बँकेतील घोटाळ्यात बँकेच्या संचालक मंडळासह शरद पवार हे मुख्य आरोपी असून त्यांच्या सांगण्यानुसारच हा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यावेळी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी राज्य शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक, व्यवस्थापकिय संचालकांवर गुन्हे दाखल केले. मात्र त्यात नावांचा उल्लेख करणे टाळले. मात्र ईडीने तत्कालीन सर्व संचालकांच्या नावांसह शरद पवार यांचेही नाव त्यात समाविष्ट करत गुन्हा दाखल केला.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *