Breaking News

राज्य सहकारी बँकेसंदर्भातील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित हिम्मत असेल तर युती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करुन दाखविण्याचे काँग्रेसचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी
सरकारच्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा भाजप सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप करून हिम्मत असेल तर युती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करून दाखवावी असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.
युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे. आता विधानसभेच्या निवडणूक प्रचारातही विरोधी पक्ष युती सरकारचा पाच वर्षातील भ्रष्ट व कलंकीत कारभार जनतेच्या दरबारात मांडतील या भीतीपोटी विरोधकांचा आवाजच दडपण्याचा सरकारकडून केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त विरोधी पक्षांच्याच लोकांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया कशा काय होत आहेत असा सवाल करत हे जनतेला कळत नाही अशा भ्रमात भारतीय जनता पक्षाने राहू नये असा इशाराही त्यांनी दिला.
आदिवासी विभागातील घोटाळा, मुंबईतील एमपी मीलमधील एसआरए घोटाळा, अंगणवाड्यांच्या साहित्य खरेदीतील घोटाळा, सिडको जमीन घोटाळा, जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यासह अनेक घोटाळे विरोधी पक्षांनी उघड करुन सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा केला. परंतु एकाही घोटाळ्याची साधी चौकशीही न करता सरकारने क्लीन चिट देऊन टाकल्या आहेत. एसआरए घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांवर ताशेरेही ओढलेले आहेत. परंतु पारदर्शी कारभाराचा ठेंभा मिरवणाऱ्या सरकारने मंत्र्यांना वगळून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
या सरकारमध्ये एकही भ्रष्टाचार झाला नाही असा विश्वास जर भाजप सरकारला असेल तर चौकशी करुन ‘पारदर्शकता’ का सिद्ध करुन दाखवली नाही ? जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे मंत्र्यांनीच अधिवेशनात कबूल केले होते, त्याची चौकशी का केली नाही ? प्रकाश मेहता यांना मंत्रीमंडळातून का वगळावे लागले ? याची उत्तरेही भाजप सरकारने दिली नसली तरी जनतेला सर्व माहित असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात सूडाच्या राजकारणाला आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने थारा दिला नाही. राजकीय मतभेद असले तरी विरोधकांना संपवण्यासाठी सूडबुद्धीने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला गेला नाही. सध्या मात्र भारतीय जनता पक्ष सूडाचे राजकारण करु पाहत आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसंदर्भातील कारवाईसुद्धा राजकीय हेतूने प्रेरित असून या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *