ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे ब्राह्मणेत्तर विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुळकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले, पण कृष्णाजी कुळकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनी मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी. राजकारणात भ्रष्टाचार आहे, पण त्याहीपेक्षा महाराजांना जातीत बांधू पाहणाऱ्या या विद्वानांची विद्वत्ता भ्रष्ट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य जाती-धर्मापलीकडचे होते असेही ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन सुरु असलेला वाद आणि त्यांच्या ‘छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत विभागणाऱ्या ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित इतिहासकारांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवरायांबद्दल विकृत इतिहास लिहिण्याचा प्रघात निंदनीय असून त्या सर्वांचा इतिहास विवेकवादाने खोडल्याचे सबनीस यावेळी म्हणाले.
महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी असेही त्यांनी सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचा अभ्यास मला आदरणीय आहे. त्यांनी शिवाजी महाराज घरादारात पोहचवले, हेही मला मान्य आहे, पण त्यांच्या इतिहासातील शिवाजी ब्राह्मणांकडे झुकलेला आहे. तर ब्राह्मणेत्तर शरद पाटलांनी देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग केल्याचे त्यांनी सांगितले.
