लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे नाव देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी निश्चित करण्यात आलं आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.
विशेष म्हणजे ‘इंजिनीयर कोर’मधील मनोज पांडे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुख पदी विराजमान होणार आहेत. पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून ते इंजिनीयर कोरमध्ये १९८२ला सेवेत दाखल झाले होते. डिसेंबर २००१ ला संसदेवरील हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन पराक्रम ही मोहिम राबवली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य हे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते. तेव्हा जम्मूमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पल्लनवाला भागात इंजिनीयरच्या तुकडीचे नेतृत्व पांडे यांनी केले होते.
जनरल नरवणे हे निवृत्त होत असले तरी त्यांचे नाव हे संरक्षण दल प्रमुख पदासाठी चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याने ते पद रिक्त आहे. तेव्हा नरवणे निवृत्त होतांना संरक्षण दल प्रमुख पदाबाबतही काय निर्णय होणे अपेक्षित आहे.
