Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र तर फडणवीस म्हणाले, NCRB ने फक्त …

मागील १० दिवसांपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या २९२ अन्वयेखाली अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य भाषणाच्या सुरुवातीलाच केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर जाण्यासाठी निघाले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले, जयंतराव बाहेर चालले का, अहो तुम्ही गेल्यावर मजा येणार नाही असे सांगातच शरद पवार गटाचे समर्थक जयंत पाटील हे सभागृहात थांबले.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळातील मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत राज्यात लोक मृत्यू पावत होते. मात्र त्यावेळचे मुख्यमंत्री हे टेंडरचा पाऊसचा पाडण्यात मग्न होते. तसेच उड्डाणपूल बांधणाऱ्या कंपनीला कंत्राट देणे पण त्याचा खरा व्यवसाय कपड्य़ाच्या दुकानाचा असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे सांगत मातोश्री १ ते मातोश्री २ हा प्रवास अभिमानाचा असल्याचा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी धारावीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर टीका करताना म्हणाले, आता खर्चाचा प्रश्न निर्माण झाल्यानेच धारावी करांना सोबत घेऊन अदानीच्या विरोधात मोर्चा काढल्याची टीका ठाकरे पिता पुत्रांचे नाव न घेता टीका केली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्याचे पोलीस दल जागरूक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे पार पाडीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा होऊन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या माध्यमातून आपण सर्व त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणाबाबतही सकारात्मक चर्चा होऊन शासनाने आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभेत नियम २९२ अन्वये उपस्थित अंतिम आठवडा प्रस्तावाला तसेच २९३ अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

अधिवेशनात उपस्थित झालेल्या विविध मुद्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेवर टीका झाली होती. मात्र, तीच योजना राबविण्याची मागणी आता पुन्हा होत आहे. परकीय थेट गुंतवणुकीपासून शिक्षण क्षेत्रात राज्य पुन्हा आघाडीवर आले आहे. मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, मुंबई पुण्यातील मिसिंग लिंक, एमटीएचएल, कोस्टल रोड या कामांना गती देण्यात आली आहे.

शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करणार

शाळा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासन ठोस पावले उचलित आहे. माझी शाळा, सुंदर शाळा, महावाचन अभियान आदी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संचमान्यता, शिक्षक भरती आदींच्या माध्यमातून शाळांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. आदर्श शाळा तयार करून या शाळांमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम प्राथमिकस्तरावरच नष्ट करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यापुढे कुणालाही अतिक्रमण करता येणार नाही असे सांगून यात अधिकारी दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.

धारावी : रहिवाश्यांचे जीवनमान उंचावणार

मुंबईतील सुमारे दहा लाख रहिवाश्यांसाठी धारावी पुनर्विकास हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. या माध्यमातून झोपड्यांमधून जीवन व्यतित केलेल्या रहिवाशांना यातनामुक्त करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पातील निविदेच्या अटी कायम ठेवण्यात आल्या असून रहिवाश्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा मिळाव्यात याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये वरच्या मजल्यासाठी पुनर्वसनाच्या सुविधा मिळत नाहीत, तथापि या प्रकल्पामध्ये त्यांना सुद्धा लाभ मिळणार असल्याचे तसेच पात्र लाभार्थ्यांबरोबरच अपात्र लाभार्थ्यांना देखील लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. धारावी क्षेत्रात इमारतींना उंचीची मर्यादा असल्याने तेथील टीडीआर इतरत्र विकणे गरजेचे असल्याचे सांगून हा व्यवहार पारदर्शक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकल्पासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

मुंबईसह राज्यात प्रदूषण कमी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत असून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकासाची कामे करणाऱ्या यंत्रणांना धूळ आणि राडारोडा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. मुंबईत डीप क्लिनिंग मोहीम हाती घेण्यात आली असून अँटी स्मोक गनचा वापर करण्यात येत आहे. पुढील टप्प्यात राज्यातील सर्व शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोपः NCRB ने लोकसंख्या विचारात न घेतली नाही
मुंबईतून एकही हिरा उद्योग सुरतला गेला नाही

मुंबई शहरातून सुरतला हिरा उद्योग केल्याची चर्चा होत आहे. मात्र मुंबईतून एकही उद्योग सुरतला गेलेला नाही. एकही उद्योग सुरतला जाणार नसल्याचे मुंबई हिरा उद्योग संघानेही स्पष्ट केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाने प्रयत्न केल्यामुळे मुंबईतून हिरा निर्यात सुरतपेक्षा कितीतरी पटीने वाढून ९७ टक्के झाली आहे. तर सुरतची निर्यात सध्या २.५७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जेम्स ॲण्ड ज्वेलरीसाठी मुंबई शहरात आधुनिक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ३० एकर जागा महापे औद्योगिक वसाहतीमध्ये देण्यात येणार आहे. मध्यंतरी यू.ए.ई व भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला. त्यानुसार मुंबईत मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुंबईत हिरा उद्योगात मलबार गोल्ड १७०० कोटी गुंतवणूक करीत असून तुर्की डायमंड, तनिष्कदेखील गुंतवणूक करणार आहे. मलबार गोल्ड कंपनी तर देशाचे मुख्यालय मुंबईत करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल उत्कृष्ट काम करीत असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्रग्जवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

ड्रग्ज व्यवसायावरील कारवाईत २४ हजार जणांवर कारवाई सुरू आहे. राज्यात अनेक नवनवीन प्रयोग आणि प्रकल्प हाती घेण्यात आले असून एन कॉर्ड हे नवीन सेंटर सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन लॉटरी, सेक्स्टॅार्शन यावरही मोठी कारवाई होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात २३ हजार पोलीस भरती

राज्यात १९७६ नंतर यावर्षी पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यानुसार संपूर्ण आराखडे आणि नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून २३ हजार पोलिसांची भरती करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हरविलेल्या मुली आणि महिलांबाबत माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी चार हजार मुली आणि ६४ हजार महिला बेपत्ता होतात. मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असून मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात मुली परत येण्याचे प्रमाण सरासरी ९० टक्के, तर महिलांच्या बाबतीत ८६ टक्के आहे.

महाराष्ट्रात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असून २०२० मध्ये ते ३,९४,०१७ तर २०२२ मध्ये ३,७४,०३८ इतके असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र नव्हे तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश हे पहिले ५ राज्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

खून होण्याच्या बाबतीत उत्तरप्रदेश- ३४९१ आणि बिहार – २९३० च्या तुलनेत महाराष्ट्र – २२९५ जरी संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असला तरीही प्रती लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र २० व्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.

महिलांवरील हल्ल्यांबाबतही लोकसंख्येच्या आधारावर प्रती लाख लोकसंख्येनुसार चा दर ओरिसा- १८.९, राजस्थान- १६.२, केरळ- १४.८, कर्नाटक- १२.२, उत्तराखंड- ११.६, आंध्रप्रदेश- ११.५ यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा दर- ८.६ म्हणजे सातव्या क्रमांकावर, बलात्कारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावर, अपहरणांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर, विनयभंग प्रकरणी महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अपहरण प्रकरणी महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्यात दंगली होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असे म्हटले जाते. तथापि, मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२२ मध्ये यात ५.६ टक्के घट झाली ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्व जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर हे सुरक्षित शहर : गुन्ह्यांची संख्या कमी

नागपूरमध्ये एकूण गुन्ह्यांच्या आकडेवारीतही घट झाली असून २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये ३१५५ कमी गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. २०२१ मध्ये नागपूर देशात दुसऱ्या क्रमांकावर तर २०२२ मध्ये देशात आठव्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. खुनांच्या संख्येतही ३३ टक्के घट झाली असून देशात दुसऱ्या क्रमांकावरून आता सातव्या क्रमांकावर आले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात नागपूर पाचव्या क्रमांकावर होते ते आता सहाव्या क्रमांकावर असून बलात्काराच्या घटनेत चौथ्यावरुन सहाव्या क्रमांकावर आल्याचे ते म्हणाले. हुंडाबळीच्या केवळ दोन घटना घडल्या असून बाल आरोपींकडून २०३१ च्या ३५१ त्या तुलनेत २०२२ मध्ये २१ गुन्हे घडल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांसाठी विविध प्रकल्प

पोलिसांसाठी आतापर्यंत ४०७८ प्रकल्प हस्तांतरित झालेले असून ६४५३ निवासी/ अनिवासी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ३०० प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध झाली असून ४५४१ प्रकल्प निविदास्तरावरील प्राधान्य मिळालेले तर, २१,१४८ प्रकल्प नियोजनस्तरावर आहेत. १८७ पोलिस ठाणे, ४६ प्रशासकीय इमारती, ३०५ सेवा निवासस्थाने प्राधान्यक्रम यादीस सरकारची मंजुरी असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा १ मध्ये ५२६० कॅमेरे लावले असून अमरावती, नांदेड येथे टप्पा-२ हाती घेण्यात आला आहे.

मराठा आंदोलनातील खटले मागे

मराठा आरक्षण आंदोलनात एकूण ५४८ खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी पोलिस महासंचालकांनी त्यांच्या स्तरावर अंतिम केलेले खटले १७५, शासनाकडे शिफारस केलेले ३२६, शासनाने मागे घेतलेले ३२४, शासनाने अमान्य केलेले २, न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले २८६, न्यायालयाचे आदेश प्रलंबित असलेले २३, नुकसानभरपाई न दिल्यामुळे प्रलंबित असलेले १० तर निकषात न बसणारे ४७ खटले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *