Breaking News

शरद पवार म्हणाले, मी अनेकवेळा शपथ घेतली पण… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना पेढा भरविल्याप्रकरणी लगावला टोला

शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दावा करण्यास गेलेल्या एकनाथ शिंदे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पेढा भरविल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली. यापार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, मी मागील अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. तसेच मी अनेक वेळा विविध पदासाठी शपथ घेतली. मात्र माझ्या तोंडात कधी कोणत्या राज्यपालांनी पेढा भरवला नाही असा टोला लगावत पण राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी गेलेल्या एकनाथ शिंदे यांना मात्र राज्यपालांनी आवर्जून पेढा भरविल्याचे सांगितले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले. मात्र यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधि सोहळ्या दरम्यान शपथ वाचताना झालेल्या चुकांकडे साफ दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाबाबत भारतीय कुस्तीगीर संघाने जो काही निर्णय घेतला आहे. त्याचे अधिकार राष्ट्रीय समितीला आहेत. मी स्वतः या संघटनेचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्र आणि देशाबाहेरच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही मी काम पाहिलं आहे. या सगळीकडे काम करत असताना मी कामाचे दोन भाग करतो. एक भाग खेळ आणि खेळाडूंबाबत तर दुसरा भाग क्रीडा संस्थेच्या प्रशासनाबाबत. खेळासंदर्भातील अंतर्गत बाबींपासून मी स्वत:ला दूर ठेवतो. कारण तो माझ्या कामाचा भाग नाही.

बीसीसीआयचा अध्यक्ष असतानाही मी निवड समितीचं काम कधीही केलं नाही. माझ्यासारख्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी यात पडता कामा नये. शासकीय क्षेत्रात काम करताना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि संघटनांना फायदा मिळण्यासाठी मी काम केले. माझं काम खेळाडूंना मदत करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावणं आहे. कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असलो तरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणं, हे माझे काम नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादाबाबत बोलताना पवार म्हणाले, मी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष रामदास तडस आणि कुस्ती क्षेत्रात काम करणारे काका पवार यांच्यासोबत एकत्र बसून अन्य पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू. तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचा गैरसमज दूर करून महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला यातून बाहेर कसं काढता येईल, याचा विचार करू. जिथे बदल करण्याची आवश्यकता आहे, तिथे तो बदल करू. त्याचबरोबर या निर्णयाचा खेळाडूंच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांना मी आश्वासित करतो असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *