Breaking News

जयंत पाटील म्हणाले, … काय चाललंय हे जनतेला दिसतय महाविकास आघाडीचे राजन साळवी उमेदवार...

आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो. मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही आता दुसरे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना आमदार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सत्ता बदलाच्या ज्या एकंदरीत घटना झाल्या त्या सर्व न्यायालयात गेल्या आहेत. १६ बंडखोर आमदारांचे निलंबन करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना काढलेल्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वेळ दिली होती. त्याच्या आधी अशी निवडणूक होऊ नये आणि सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण आहे त्याचा खुलासा झाल्यावर व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने पत्र देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड राज्यपालांकडे मागण्यात आली होती. परंतु राज्यपालांनी त्याला काही महिने परवानगी दिली नव्हती असे सांगतानाच उद्या अध्यक्ष पदाची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणे सभागृहाचे काम करण्याचा अधिकार आहे. किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे ती निरपेक्षपणे पार पाडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा सांधताना म्हणाले, मी १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत. १९७२ ते १९९० पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या. परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केले आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ देताना आपण पाहिले. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला असा जोरदार टोला लगावला.

नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधीची आठवण करून देताना शरद पवार म्हणाले,  शपथ घेताना मी टीव्हीवर पाहिले. मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरुन वगैरे वगैरे ते बोलले ही शपथ दिली कुणी तर राज्यपाल यांनी हे सांगतानाच आमचे सरकार आले त्यावेळी मी पहिल्या लाईनमध्ये बसलो होतो आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र कालच्या शपथेवेळी श्रीमान राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *