Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, त्या दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकार काय लपवतंय ? राज्यपालांना पत्र, खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र लिहून केली आहे.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात की, नवी मुंबईतील खारघर येथे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता तसेच यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही श्रीसदस्यांसाठी तंबूही बांधण्यात आला नाही, त्यांना कडक उन्हात तासन तास बसावे लागले, या लोकांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे १४ मृत्यू झाले आहेत व ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच कार्यक्रमाची वेळ दिली होती असे सांगून सरकार आता त्यांनाच दोषी ठरवत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे. या सरकारला जनाची नाही तर मनाची असती तर आतापर्यंत राजीनामे दिले असते पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे परंतु काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी दिनांक २४ एप्रिल रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *