Breaking News

भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडणार नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी

मागील चार वर्षापासून राज्याच्या सत्तेत विराजमान असूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये सातत्याने कलगीतुरा सुरुच आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या अटकळी सातत्याने बांधण्यात येत होत्या.मात्र भाजपबरोबरील सत्तेतून आम्ही बाहेर पडणार नाही, पण सत्तेत राहून राज्यातील जनतेच्या हिताची कामे करू अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज दिली.

शिवसेनेच्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांची वांद्रे येथील रंग शारदा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील खुलासा केला.

वर्षाच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात आगामी काळातील कोणतीही निवडणूक भाजपबरोबर युती करून लढविणार नसल्याची घोषणा करत सर्व निवडणूका एकट्यानेच लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युती होईल याचा विचार न करता पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.

नेमक्या याच कालावधीत शिवसेनेकडूनही सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत भाजपला देत दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भेटीगाठींवर भर दिला. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण अस्थिर झाल्याचे चित्र निर्माण झाले. तसेच मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या आमदार-खासदरांनीही राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याबाबतची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी केली.

परंतु, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकांना एकवर्षाचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजबरोबरील सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत शिवसेनेबाबतच्या व्यक्त करण्यात येत असलेल्या शक्यता मोडीत काढल्या.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *