Breaking News

सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजप नेते मस्तवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

इंदापूर : प्रतिनिधी

सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विशाल जनसंघर्ष सभेत बोलत होते.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज सहाव्या दिवशी पुणे जिल्ह्यात पोहोचली. गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. इंदापूर येथे जाहीर सभेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात भाजपवाल्यांनी देशाला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारातून अफाट पैसा कमावला आहे. सत्ता आणि पैशाच्या मस्तीमुळे भाजपचे नेते उन्मत झाले आहेत त्यामुळे त्यांना सामान्यांचे हाल दिसत नाहीत. बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार मागितला तर पंतप्रधान पकोडे विका असे सांगून थट्टा करतात. राज्य सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची थट्टा करित आहेत. भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. ज्या सहकार चळवळीमुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला ती सहकारी चळवळ व साखर उद्योग मोडून काढण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालवला आहे. इंदापूरच्या जागेबाबत आपण स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून तुम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या मागे ठामपणे उभे रहा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उपस्थितांना केले.

या सभेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. रामहरी रूपनवर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, माजी मंत्री आ. डी. पी. सावंत, आ. सतेज पाटील, आ. सुनिल केदार, आ. अमरनाथ राजूरकर, आ. अमर काळे काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा उद्या दि. ६ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील पर्वती, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टॉन्मेंट व हडपसर या मतदारसंघातून जाणार आहे.

सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज म्हणाले की, मोदींनी भूलथापांना देऊन जनतेला फसवले आहे. कॅगने युपीए सरकारला बदनाम केले. भाजपच्या नेत्यांनी युपीए सरकारवर बेछूट आरोप केले गेल्या चार वर्षात एकही पुरावा देऊ शकले नाहीत. उलट गेल्या चार वर्षाच्या काळात मोदींनी अनेक घोटाळे केले आहेत. राफेल विमानाची खरेदी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप करून मोदी राफेल विमानाची किंमत का जाहीर करत नाहीत? असा सवाल केला. बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्येही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करून निविदा न काढता बुलेट ट्रेनचे करार कसे केले? असा प्रश्न सरकारला केला. मोदींना सर्वसामान्य जनतेचे काही देणेघेणे नाही ते आपल्या उद्योगपती मित्रांसाठी देश चालवत आहेत असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले की, देशातील सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. सर्वात जास्त अफवा पसरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना अफवा पसरवू नका असे आवाहन करत आहेत हे हास्यास्पद आहे. भाजप शिवसेना सरकारने राज्याचे वाटोळे केले असून मेक इन इंडियाचा सिंह आडवा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचे पक्षावरील नियंत्रण सुटले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांच्या युवराजांच्या गाडीचे टायर फुटले. लवकर सत्तेतून बाहेर पडले नाहीत तर त्यांचे नशीबही फुटणार आहे असा टोला शिवसेनेला लगावला. आमच्या माता भगिनींबाबत बेताल वक्तव्य करणा-या राम कदमचे विधानसभा सदस्यत्व रद्द केल्याशिवाय सभागृहाचे काम चालू देणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थीती आहे. सरकारने दुधाला २७ रूपये प्रति लिटर भाव जाहीर केला पण शेतक-यांना मिळत नाही. राज्यात तोंडभांडवली सरकार असून मागेल ते देण्याची घोषणा करतात पण नंतर अटी व शर्ती लावतात व लाभापासून वंचित ठेवतात. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणा-या काँग्रेसचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या सभेला मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सरकार इंदापूर वर अन्याय करत आहे. उजनी धरण व भरलेले आहे त्या धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडेल जात आहे पण परिसरातील शेतक-यांना पाणी दिले जात नाही. भाजप सरकारने गेल्या चार वर्षात एकही काम केले नसून आम्ही केलेल्या कामाची उद्घाटने भाजपचे मंत्री करत आहेत. भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले असून २०१९ साली काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *