Breaking News

अजित पवार गट- शरद पवार यांच्यात चर्चा, जयंत पाटील यांनी दिली ही माहिती भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी शरद पवार यांची भूमिका

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत अजित पवार यांनी राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर यथेच्छ टीका केली. त्यानंतर आता कायदेशीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अजित पवार गटाने नमती भूमिका घेत काल रविवारी आणि आज सोमवारी असे सलग दोन दिवस शरद पवार यांची भेट घेत पक्षाच्या एकसंधतेसाठी काही तरी मार्ग काढा अशी विनवणी करत जवळपास एकतासाहून अधिक काळ चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला काय उत्तर दिले यावरून तर्क-वितर्क मांडण्यात येत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. शरद पवार यांना भेटून काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती, त्याच विनंतीचा आज पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकून घेतली.

मला इथं नमूद करायचं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधात आहे. आमचे सर्व आमदार आज अधिवेशनावेळी विरोधी पक्षांबरोबरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील नऊ सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली आहे. तुम्ही आजची अधिवेशनातली व्यवस्था पाहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विखुरले होते. काही जण विरोधी पक्षांच्या बाजूला बसले होते, तर काहीजण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले होते अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय, त्यावर तुम्ही काय सांगाल? याप्रश्नावर बोलताना ते म्हणाले, या कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका याआधी स्पष्ट केली आहे. तसेच येवल्यातल्या सभेतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली होती. त्यामुळे रोज त्यांना कोणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही असे मतही मांडले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *