Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्री, मुख्य सचिवांची… हिंसाचार हे इंटेलिजन्स फेल्युअर असल्याचा केला आरोप

बरोबर पाच वर्षभरापूर्वी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगांव भीमा येथील विजयीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून गेलेल्या दलित समाजावर अचानक हल्ला करून हिंसाचार करण्यात आला. त्याचे पडसाद त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. याप्रकरणाची सखोल चौकशी कऱण्यासाठी स्थापन कऱण्यात आलेल्या आयोगासमोर वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांना आज बोलाविण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी या हिंसाचार प्रकरणी देशांतर्गत गुप्तचर यंत्रणाना जबाबदार धरत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांची उलट तपासणी करण्याची मागणी केली. याबाबत आंबेडकर यांच्याकडून २४ जुलै रोजी शपथपत्र सादर करण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात आली आहे.

चौकशी आयोगाने आंबेडकर यांना शपथपत्र सादर करण्यासाठी बोलविले होते. यापूर्वी दोन वेळा आंबेडकर यांना आयोगाने बोलविले होते. मात्र, ते येऊ शकले नव्हते. आयोगाने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव मलिक आणि तत्कालीन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांची उलटतपासणी घेण्यासाठी आयोगासमोर पाचारण करण्याबाबत आंबेडकर यांनी आयोगाला पत्र दिले होते. सोमवारी (१७ जुलै) आयोगासमोर आंबेडकर यांनी पुन्हा हीच मागणी केली. त्यावर आयोगाने त्यांचे म्हणणे शपथपत्राद्वारे सादर करण्याची सूचना आंबेडकर यांना केली. त्यावर २४ जुलै रोजी ही मागणी शपथपत्राद्वारे सादर करू, असे आंबेडकर यांनी आयोगाला सांगितले.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हे देशांतर्गत गुप्तहेर संघटना आणि पोलिसांना आलेले अपयश (इंटेलिजन्स फेल्युअर) आहे. या धर्तीवर फडणवीस, मलिक आणि हक यांना पाचारण करण्याची मागणी असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांना अजित पवार यांच्या बंडाबाबत विचारले असता ते म्हणाले, दुर्दैवाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यंदाची दिवाळी एकट्याला साजरी करावी लागेल, असे वाटते आहे. पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबासोबत साजरी करतील अशी अपेक्षा करुया.

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काल एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत शेतकरी सर्वांत शेवटी होता. या सरकारच्या रेकॉर्डमध्ये शेतकरी कुठेही दिसत नाही, हे खिसे भरणारे सरकार असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे-फडणवीस- पवार सरकारवर केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *