Breaking News

शरद पवार म्हणाले, … ते मी कधीही ऐकलं नाही एक शिवसेना तर दुसरी शिंदे सेना दोघात तिसऱ्या पक्षाने येण्याचे कारण नाही

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शिवसेनेने भाजपाबरोबरील युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन कऱण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने काँग्रेसला दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यावरून राज्यातील चर्चेच्या फेऱ्या खाली बसल्या नाहीत तोच दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आमच्याकडे कोणी प्रस्ताव दिला नाही. राष्ट्रवादीला जर कोणी प्रस्ताव दिला असेल तर मला थोडफार तरी माहीत असेल. राष्ट्रवादीचे सगळे निर्णय घेण्याचा आमच्या अन्य लोकांना अधिकार आहे. परंतु तरीही ते माझ्या कानावर घालतात. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही असा खुलासा केला.

पुण्यात काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

याचबरोबर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे व ठाकरे गटातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले, दुर्दैवाने एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्यामधून एक स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होतात. संघर्ष होतो पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. ही मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते काही राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्याचे जे जबाबदार (मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस) लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांसारखे वरिष्ठ लोकांवर असेल. त्याहीपेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या १४ कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही उद्या ते मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळव्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत केली जात आहे, असा भाजपाकडून आरोप होत आहे. यावर पवार म्हणाले. या सगळ्या गोष्टींमध्ये राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे आणि दुसरा कार्यक्रम शिंदेंच्या सेनेचा आहे. त्यामध्ये अन्य पक्षाने येण्याचं काही कारण नाही असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात थेट ‘सामना’ या ठिकाणी होणार आहे. त्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार? अशी चर्चा सुरु होती. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले.
या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अंधेरी पूर्व निवडणुकीत कोणाला पाठिंबा दर्शवणार, असा सवाल विचारला. त्यावर राष्ट्रवादी पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *