Breaking News

चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

रत्नागिरी: प्रतिनिधी
चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेवर व इतर प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता त्यावेळी ते बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टिका करत आहेत मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जुरुरी नाही. भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिकजी माहिती उघड करत आहेत त्याला समीर वानखेडे उत्तर देतील. मात्र समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात समीर वानखेडे आणि नवाब मलिक आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
भारतात १२० कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे त्यातही केवळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा-वीस वर्षांपूर्वीची कागदं काढायची आणि चौकशीचा ससेमिरा सुरु करायचा, रेड टाकायची, त्यांची बदनामी करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करतेय हे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.
अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय…
अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भ, खान्देश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास ९ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात पोहोचली आहे. आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.
माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचे नाही. त्यांना जावून एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपले नवं संघटन येथे तयार व्हायला हवे होते. त्यामुळे मरगळ झटकून नव्याने पक्षाची बांधणी करा असे आवाहनही त्यांनी केले.
आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत हवी ती मदत केली जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा असेही मार्गदर्शनही केले.
विकासाच्या बाजूने उभा राहणारा एक मोठा गट रत्नागिरीत आहे, पवारसाहेबांवर प्रेम करणारा गट या भागात आहे. या लोकांना आपल्या बाजूला आणण्यासाठी काम करा. मला खात्री आहे हे लोक आपल्या मागे उभे राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगला निकाल याठिकाणी मिळेल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार संजय कदम, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते बाप्पा सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, किरण शिखरे, किरण शेटये आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *