Breaking News

धर्मवीर की स्वराज्यरक्षक ? वादावर शरद पवारांचे महत्वपूर्ण विधान ठाण्यात जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. दरम्यान स्वतः अजित पवार हे दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर आलेले नाहीत. आज सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आले असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर भाष्य केले. तसेच अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येऊन बोलतील असे सुतोवाच देखील केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहिरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट करत या वादावर पडदा टाकावा असे आवाहन केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन औरंगजेब हा क्रूर किंवा हिंदूद्वेष्टा नव्हता असे सांगितले होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, असे वक्तव्य केले होते. यावरून विधानानंतर भाजपाच्यावतीने संतप्त प्रतिक्रिया उमटली. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता शरद पवारांनी एका ओळीत प्रतिक्रिया दिली.

मात्र जेव्हा जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पाहिलेले किंवा ऐकलेले नाही. अजित पवार काय म्हणाले ही मी टीव्हीवर पाहिले. त्यामुळे त्यावर मी बोललो. कुणी आमदार बोलतात, कुणी कार्यकर्ते बोलतात त्या सगळ्यांचा उल्लेख करावा किंवा स्पष्टीकरण करावे याची मला आवश्यकता वाटत नाही असे सांगत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलण्याचे शरद पवार यांनी टाळले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *