Breaking News

संजय राऊत यांची टीका, टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले जातात शिंदे गट एक टोळी असल्याने त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही

हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकिय वातावरण काही काळ शांत राहिल असे वाटत असतानाच भाजपाने संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आणखीनच भर घालत राजकिय वातावरण चांगलेच तापविले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर खोचक शब्दांत हल्लाबोल केला असून शिंदे गटाला त्यांनी टोळीची उपमा देत टीकास्र सोडले.

संजय राऊतांना माध्यम प्रतिनिधींनी शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आम्हाला भाजपाने एकही जागा दिली नाही तरी चालेल, असं वक्तव्य केल्याबाबतची विचारणा संजय राऊत यांना करण्यात आली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,  कारण जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. त्यांना शिवसेनेबरोबर भाजपाची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपात विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील, असा इशारा दिला.

यावेळी संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल, अशी टीकाही केली.

यावेळी बोलताना संजय राऊतांनी संभाजी महाराजांचा ‘धर्मवीर’ उल्लेख करण्यावरून भाजपाला सुनावलं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडलेल्या भूमिकेवर भाजपानं आक्षेप घेतल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? ते जुने-पुराणे नेते होते, आता त्यांचं महत्त्व नाही हे राज्यपालांचं विधान भाजपाला मान्य आहे का? यावर आधी उत्तर द्यावं अशी मागणी करत शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो असेही म्हणाले.

इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. महाराष्ट्रानं राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपानं आपलं मत आधी व्यक्त करावं. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *