Breaking News

परब यांच्या नोटीसप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मलिक यांचे भाजपावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व सूडबुध्दीने व राजकिय हेतूनं घडत असल्याचा आरोप केला.

निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी भाजपावर केली.

अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

राजकिय सूडबुध्दीने व राजकिय हेतून घडतयं-मलिक

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकिय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावर मलिक यांनी भाजपावर टीका केली.  ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी. परंतु ज्यापध्दतीने भाजपाचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे असेही ते म्हणाले.  सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

पुरेसे संख्याबळ मविआकडे पण, बाजी मारली भाजपाने; शिवसेनेच्या ‘संजय’चा पराभव निकाल पहाटेला जाहिर, मविआ आणि भाजपाला तीन तीन जागी विजय

राज्यसभा निवडणूकीतील मतदान करण्याच्या पध्दतीवरून भाजपा आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर आक्षेप घेत त्याप्रश्नी केंद्रीय निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published.