Breaking News

बार्टीच्या प्रश्नावरून भाजपा आणि पवार गटाच्या नेत्यांनी धरले शिंदे गटाच्या मंत्र्याला कोंडीत अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आश्वासन उत्तर सुधारून देण्याचा प्रयत्न

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे विधानसभेत दिसून आले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत शेलार आणि जयंत पाटलांनी मंत्री देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना चांगलेच अडचणीत आणलं तर दुसऱ्याबाजूला नेहमी संयमीत असलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही सरकारी पक्षाला खडसावत मंत्री गंभीरपणे उत्तरे देत नसल्याची टीका करत त्यांना जरा अभ्यास करायला लावा, अशी कडक शब्दात सूचना केली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आहे. दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासाला ‘बार्टी’च्या प्रश्नावरुन भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची शाळा घेतली. शंभूराज देसाई यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगितल्याने जयंत पाटील आणि आशिष शेलार दोघेही देसाई यांच्यावर भडकले.

भाजपाचे आशिष शेलार म्हणाले, बार्टीच्या माध्यमातून मागासवर्गीय तरुणांना स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, ज्यातून पोलीस भरती असेल किंवा बँक भरती असेल अशा परीक्षांची तयारी मुलांना करता येते. या विद्यार्थ्यांना खासगी दर परवडत नाही म्हणून ती सोय सरकारने करुन द्यावी आणि त्यासंदर्भातला निधीही सरकारने उपलब्ध करुन द्यावा, अशी सरकारची योजना आहे. ती अतिशय चांगली योजना आहे. पण आम्ही यासंदर्भातला प्रश्न विचारल्यानंतर सरकार आम्हाला सांगतंय की, आम्ही आणि न्यायालय बघून घेऊ, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण? न्यायालयात आम्ही उत्तर देऊ, हे उत्तरच आम्हाला मान्य नाही… शेवटी हा प्रश्न मागासवर्गीयांचा आहे ना… बजेट या सभागृहाने मंजूर केलं ना… २० हजार विद्यार्थ्यांचं आयुष्याचा शेवटी हा प्रश्न आहे. मंत्री महोदय हे उत्तर सुधारणार का? हा माझा त्यांना प्रश्न आहे.

त्यावर, शंभूराज देसाई म्हणाले, या प्रश्नाची सविस्तर माहिती मी घेतलेली आहे. जे जे उपप्रश्न विचारले आहे, त्यांची समाधानकारक उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन, असं उत्तर दिलं. तसंच मी उत्तर द्यायला तयार आहे पण माझं थोडं तरी ऐकून घ्या अशी विनंती आशिष शेलार आणि जयंत पाटील यांना केली.

त्यावर जयंत पाटील यांनी हरकत घेतली. ते म्हणाले, बार्टीच्या प्रश्नावर कोणतंही उत्तर न देता न्यायालयात याचिका आहे, त्यावर सुनावणी सुरु आहे, असं उत्तर आपण दिलंत. पण ५ वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आखून दिला, हे खरंय का? या प्रश्नावर सरकार उत्तर देत नाही. ४ मे रोजी २० हजार विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचं निदर्शनास आले आहे? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तर नाही. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कोणती कारवाई करणार आहे वा केली? यावरही सरकारकडे कोणतंही उत्तरं नाही. सरकार काय म्हणतंय, १-२-३ या प्रश्नांवर याचिका आहे. सुनावणी सुरु आहे. सदर प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता बाजू मांडत असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. प्रश्न वेगळे आहेत. सरकारने याचं उत्तर कोर्टात नेवून ठेवलंय. आमच्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणून हा प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *