Breaking News

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनात अब की बार ४०० पार चा नारा दिला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ये काँग्रेस की गॅरंटी या शब्दाची नकल करत भाजपा सरकारऐवजी मोदी सरकार की गॅरंटी हा शब्दप्रयोगही राजकारणात आणला. मात्र मोदी सरकारच्या फक्त घोषणेला कंटाळलेल्या जनतेनेही या नरेंद्र मोदी यांच्या या कथित घोषणांना थंडा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या १२ सभांचे आयोजन महाराष्ट्रात आयोजित करण्यात आल्या. मात्र या १२ सभा भाजपाच्या डेंजर झोनमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी वरदान ठरणार की विधिलिखित ठरणार याचा निर्णय येत्या चार जूनलाच समजणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपूरात तेथील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. परंतु सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेत जाण्यास इच्छुक नसल्याचे आधीच भाजपाच्या गोटात बोलले जात आहे. तसेच त्यांच्या कोमटी या जात समुहाची संख्याही अत्यल्प आहे. तसेच तेथील कुणबी अर्थात ओबीसी समाजाची मतांची संख्या मोठी असून ही मतेच येथील उमेदवाराच्या विजयात महत्वाची ठरत असल्याचे बोलले जात आहे.

या मतदारसंघातून काँग्रेसचे स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतांबरोबरच बाळू धानोरकर यांची मते प्रतिभा धानोरकर यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघातील भाजपाचे अनेक उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठीही नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. मात्र या आठ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची गडद छाया असल्याचे बोलले जात आहे.

तिसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, माढा, लातूर, पुणे, बारामती या लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे ला मतदान पार पडणार आहे. मात्र या आठही लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर, सोलापूर, माढा आणि बारामती, पुणे, सातारा, उस्मानाबाद आदी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याची चर्चा आधीच राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे मागील १० वर्षापासून या आठही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली होती. त्यामुळे भाजपाने या भागात चांगलीच पाळेमुळे वाढविण्यास सुरुवात केली होती.

परंतु आता या भागातील अनेक नेते पुन्हा आपल्या स्वगृहाशी संधान ठेवून वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात आहेत. तसेच येथील मतदारही पुन्हा पूर्वीच्या नेत्याच्या नेतृत्वात काम करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तेथील एकंदरीतच नेत्यांबरोबरच जनतेनेही भाजपाच्या नेत्यांपासून दोन हात लांब ठेवण्याचे धोरण स्विकारले आहे.

विशेष म्हणजे भाजपाला ४०० पार चा टप्पा पार करण्यास महत्वपूर्ण ठरणाऱ्या याच मतदारसंघावर भाजपाने आधीपासूनच भर दिला होता. मात्र आता या भाजपाच्या संकल्पनेस विरोधकांनी या भागात चांगलाच सुरुंग लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागातून भाजपाला अर्थात भाजपाच्या उमेदवारांना सहजासहजी विजय मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूरात छत्रपती शाहु महाराज यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर भाजपाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांचा कोल्हापूरात पराभव होणार असल्याचे आताच बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर नुकतीच कोल्हापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेचा परिणाम शुन्य असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच नरेंद्र मोदी यांनीही सुरुवातीला प्रत्येक सभेत बोलताना ये है मोदी की गॅरंटी म्हणत होते. नंतर त्यांनी भाजपा सरकार की गॅरंटी म्हणण्यास सुरुवात केली. आता तर नरेंद्र मोदी ये एनडीए सरकार की गॅरंटी, ये सरकार एसएटी की सरकार अशा घोषणाही द्यायला लागले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनाच त्यांच्या सभेचा करिष्मा संपला की काय अशी शंका वाटायला लागल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत त्या मतदारसंघात मोदी यांचा करिष्मा दिसून येणार की जे जनतेने ठरविले आहे तेच घडणार अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याचे चित्र आपल्याला ४ जूनलाच जनतेसह सर्वांना पाह्यला मिळणार आहे.

Check Also

­­पुणे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराविरोधात तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *