Breaking News

उध्दव ठाकरे यांच्या माईक हिसकाविण्याच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका आम्ही एकमेकांना देणारे, घेणारे नाही

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोलत असताना माईक खेचून घेतला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरात पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची काळजी करू नका आम्ही एकमेकांच्या गोष्टी हिसकावून घेणारे नाहीत तर परस्परांना गोष्टी देणारे आहोत असा खोचक टोला लगावत पुढील अडीच वर्षे सरकार उत्तम चालेले आणि त्यानंतरही चालेल असा विश्वास व्यक्त केला.

मागील १०-१२ दिवसांच्या अस्थिर राजकिय परिस्थितीनंतर आणि विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आज पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळापासून ते त्यांच्या घरापर्यत मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे ही उपस्थित होते.

आम्ही ज्यावेळी विश्वासमत जिंकले, त्यावेळी मी पहिल्यांदा बोलायला उभा राहिलो. उध्दवजी फार काळ अधिवेशनात आले नाहीत. त्यांना माहित नाही. मुख्यमंत्री जिंकतात तेव्हा ते आधी भाषण करत नसतात. आधी सगळे लोक अभिनंदनाचं भाषण करतात नंतर ते आभार मानतात. त्यामुळे आता चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणार आहोत. एकमेकांकडून घेणार नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

काँग्रेसनेही मोदींना चायवाला म्हणून हिणवलं पण ज्याला हिणवलं त्यांनीच यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली. मोदीजींनी असे काही पाणी पाजलं की त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, हे तुम्ही बघताय. आम्ही रिक्षावाले असू तर.. पान टपरीवाले असू तर आम्हाला अभिमान आहे. कारण सोन्याचा चमचा घेवून जे लोक पैदा होतात, त्यांनी हे समजून घ्यावं की, या देशात स्वाभिमानाने जगतो ..तो सामान्य माणूसच सेवा करणार आहे असा खोचक टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच लक्षात आलं की, शिवसेनेतील आमदारांमध्ये खदखद आहे म्हणून. परंतु राजकारणात योग्य वेळी योग्य गोष्टी करणं यालाच राजकारण म्हणतात. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमधील खदखद वाढत गेल्याचे सांगत काही गोष्टी या सस्पेन्स ठेवायच्या असतात त्या आताच उघड करता येणार असल्याचे स्पष्ट करत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *