Breaking News

राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा सल्ला

नवी मुंबई : प्रतिनिधी

आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय( कवाडे गट ), सपा यांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आज नवी मुंबईच्या विष्णूदास भावे सभागृहात पार पडला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आदीसह अनेक नेते उपस्थित होते.

 या मेळाव्यात शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यांनी सत्ता आलेल्या भाजपाचा मस्तवालपणा वाढल्याचे सांगत काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आणि आमदारांवर धाडी टाकून कसे दबावतंत्र भाजप टाकत आहे आणि केंद्रातील सत्तेचा कसा दुरुपयोग करत आहे. शिवाय उदयोग क्षेत्रात सरळमार्गाने काम करणाऱ्या उदयोगांनाही कसा त्रास दिला जात आहे याची माहिती दिली.

कर्नाटकमध्ये सत्तेचा वापर करुन दबाव टाकत धाडी टाकण्यात आल्या. मात्र कर्नाटकमधील जनतेने त्यांच्या दबावाला भीक घातली नाही. दुसरीकडे देशाचे अर्थमंत्री राहिलेले पी.चिंदबरम यांच्यावर खटला भरुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे देशासाठीचे योगदानही हे लोक लक्षात घेत नाहीत. तर कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या दहा बाय दहाच्या खोलीत रहातात. त्यांचं कामही लोकांसाठी सुरु आहे. तिथे त्यांनी भाजपाची डाळ शिजू दिली नसल्याने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत त्यांच्या लोकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. असं कधी केंद्रातील सरकारने केल्याचं ऐकलं आहे काअसा सवालही त्यांनी यावेळी केला.

 या देशात उदयोग क्षेत्रात टाटा उदयोग समुहाचं योगदान चांगलं आहे. त्यांचं कुटुंब ठराविक रक्कम लोकांच्या हितासाठी वापरते. त्यासाठी त्यांची एक ट्रस्ट आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. याचा अर्थ हा आहे की, उदयोगातील घराणे सरळमार्गाने जात आहे. त्यांना नमवण्याचे काम सध्या भाजप सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 आज महाराष्ट्रातील चित्र बदलतंय याची प्रचिती मला येत आहे. लोकं आज पर्याय मागत आहेत. त्यामुळे परिवर्तन घडवायचं असेल तर एका विचाराचे लोक एकत्र यायला हवेत. पालघर,भंडारा-गोंदिया निवडणूकांमध्ये घडलेल्या घटनांचा परामर्श घेत गोंदियाच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्या पध्दतीने वागले त्याची संपूर्ण माहिती आम्ही लेखी स्वरुपात मिळवली असून लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेवून त्यांना माहिती देणार असून त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले बनू नये असे सांगत त्यांनी वेळीच सुधारणा केली नाही, तर आम्ही त्यापुढील न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. 

Check Also

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *