Breaking News

एकनाथ शिंदे यांचे ‘ते’ ट्विट आणि शिवसेनेचा ‘हा’ मोठा निर्णय अजय चौधरी शिवसेनेचे नवे विधिमंडळ गटनेते

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेच्या २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरत गाठले. तसेच सूरतमध्ये असतानाच शिंदे यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबध संपुष्टात आल्याचे सूचक ट्विट केले. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांना बडतर्फ करण्याचा मोठा निर्णय घेत या पदाची जबाबदारी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

विधानसभेच्या गटनेता पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे. शिवसेनेनं केलेल्या या कारवाईमुळे आता शिवसेना एकनाथ शिदेंविरोधात कठोर कारवाईच्या भूमिकेत असल्याचे संकेत देण्याबरोबरच या कारवाईमुळे शिंदे आता शिवसेनेमध्ये राहणार की नाही याबद्दलच्या चर्चांना पुन्हा नव्याने उधाण आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील परतीचे दोर कापले गेल्याचा संदेश एक प्रकारे शिवसेनेने शिंदे यांना दिला आहे.

विधानसभेमधील पक्षाचा गटनेता हा विधानसभेच्या पटलावर पक्षाच्या प्रतिनिधिंकडून कोणते विषय मांडायचे, कोणाला बोलण्याची संधी द्यायची, पक्षाची भूमिका का आहे हे निश्चित करणं यासारखी महत्वाची जबाबदारी पार पाडतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे २०१९ पासून हे पद होते. गटनेता हा विधानसभेमधील आमदारांचा कामकाजा दरम्यानचा मुख्य दुवा आणि नेता असतो. मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी या पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांचे बंड शमविण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे रविंद्र फाटक या दोघांना चर्चेसाठी सूरतला रवाना करण्यात आले आहे. आता त्या दोघांमधील बैठकीत काय ठरते त्यावर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील सौख्य राहणार की संपुष्टात येणार याबाबतचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सूरत मधून ट्विट करत आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण यांच्याशी सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही की करणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेशी फारकत घेतल्याचे शिंदे यांनी एकप्रकारे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा टोला, भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *