Breaking News

एकनाथ शिंदे आणि महाजन-कुटे भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ते तर मित्र सध्या तरी वेट अॅण्ड वॉच

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड पुकारत तब्बल २२ आमदारांना सोबत घेवून सूरत येथे मुक्काम ठोकला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असतानाच भाजपाचे आमदार गिरीष महाजन आणि संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने या नाट्यामागे भाजपा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठीच भाजपाचे ते दोन आमदार गेल्याची चर्चा राज्यात रंगली असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गिरीष महाजन आणि संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत. त्यामुळे एखादा मित्र काही धाडस करत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेले असल्याचे सांगत अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्याचे मान्य केले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर टीका केली आहे. राज्यसभेला १२३ आमदारांनी भाजपाला मतदान केलं. विधानपरिषदेला तर कमाल झाली. १३४ जणांनी भाजपाला मतदान केलं. याच भितीने अडीच वर्षापासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झालीच नाही. तुम्ही सरकारमध्ये असून उपयोग काय? तुमचा आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे भाजपाला स्वत:ची ताकद दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व काय आहे, त्यांची हुशारी काय आहे हे यानिमित्ताने सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आता कोणतंही मत व्यक्त करणं घाईचं होईल. त्यामुळे वेट अँड वॉच अशी भूमिका भाजपाची आहे. अडीच वर्षापूर्वी जेव्हा हे अशास्त्रीय सरकार निर्माण झालं, तेव्हाच पहिल्या महिन्याभराच्या काळात अनेक आमदारांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं असेल तर आम्हाला तुमच्यासोबत राहायचं नाही’ असं सांगितलं होतं. पण हे त्यांच्या नेतृत्वाचं कौशल्य आहे की त्यांनी उद्याचा वायदा देऊन लोकांना आपल्यासोबत ठेवलं. भाजपाला हा धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे असं सांगून सत्तेत सहभागी व्हायला लावलं असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यात भाजपासोबत कोणतीही पूर्वयोजना नाही. यातून पुढे काय होणार आहे हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. या घडामोडींमध्ये कोणताही प्रस्ताव भाजपाने शिंदेंना किंवा शिंदेंनी भाजपाला दिलेला नाही. एकनाथ शिंदेंनी यानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वाला हा इशारा दिला असेल की तुम्ही हिंदुत्व सोडणं, अजानच्या स्पर्धा वगैरे बंद करणार असाल तर आम्ही पुन्हा येऊ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *