Breaking News

राज ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यपाल, राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्या माफीनाम्याचे पत्र जाहिर करत टीका केली. या टीकेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्यावर टीका केली. अरे तुझी लायकी तर आहे का? असा सवाल करत गुळगुळीत मेंदूचा राहुल गांधी असल्याची टीका केली.

गोरेगांव येथील नेस्को मैदानात आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली.

ज्या व्यक्तीला ५० वर्षाची शिक्षा झालीय त्या व्यक्तीला बाहेर यावेसे वाटणार. तसेच आत राहुन काही करता येत नाही म्हणून काही तरी खोटी कारणे सांगून बाहेर येणे गरजेचे वाटणार. सरसलामत तो पगडी पचास त्या अर्थाने ती एक स्ट्रॅटेजी होती. शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले जिंकले त्या मागे ही स्ट्रॅटेजी होती. ती काही चितळेची बर्फी नव्हती असे सांगत ज्याला स्ट्रॅटेजी समजून घ्यावी लागेल. पण राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा असा खोचक टोला लगावत तो काय बोलतो काही कळत नाही राहुल गांधी बोलताना तो बोलतोय की आरडी बर्मन बोलतोय समजत नाही अशी खिल्लीही राज ठाकरे यांनी उडविली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याचं वय काय? ते बोलतायत का? असा खोचक सवाल उपस्थित करत शिवाजी महाराजांविषयी नेहमी बदनामी कारक बोलायचं. केवळ राज्यपाल पदावर आहात म्हणून तुमचा मान रोखतोय. नाही तर महाराष्ट्रात शिव्यांची कमी नाही असा इशारा देत आम्हाला कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घ्यायचा नसल्याचेही निर्वाणीचा इशारा दिला.

आजारपणाचे कारण काढून घरात बसलेले असे सूचक उद्गार काढत राज ठाकरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत अशी काही जादूची कांडी फिरविली की आता फिरतायत सगळीकडे. या उध्दव ठाकरेंवर एक तरी केस आहे का? कधी भूमिका घ्यायची नाही कधी घेणार नाही. फक्त वापरून घ्यायचं असे हे आहेत. पण मी तसा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसात महाराष्ट्राचा खोळंबा झालाय. या गटाला मान्यता मिळणार का त्या गटाला मान्यता मिळणार, पण त्यांची डोकी त्यांना खाजवू द्या असे सांगत शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या न्यायालयीन वादावर भाष्य करण्याचे टाळले.

मागील काही दिवसांपासून महापुरूषांची बदनामी करण्याचे काम सध्या सुरु आहे. मध्यंतरी कोणी तरी पंडीत नेहरू यांचा एक फोटो व्हायरल केला आणि म्हणाले हे बघा पंडीत नेहरूंचे अफेअर. त्या फोटोतील महिला कोण होती माहित आहे का? ती पंडीत नेहरूंची नात होती. त्यांच्या घरातील होती. तिच्याविषयी असा अपप्रचार. मग अशा फोटोनंतर काँग्रेसवाले तिकडून काही तरी काढणार आणि त्यावरून पुन्हा महापुरुषांची बदनामी करणार. हे बस्स झाले आता महापुरूषांची बदनामी भाजपा आणि काँग्रेसने थांबवावी असे आवाहन करत या बदनामीतून काय मिळालं असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सध्याच्या प्रश्नांवर उद्योग, बेरोजगारी यावर कोणी बोलतच नाही असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरे पुढे म्हणाले, इथे असलेल्या नेत्यांवर तुमचा अंकुश पाहिजे. त्यांचा अंकुश तुमच्यावर नको आहे. त्यांनी जर तुमचं ऐकलं नाही तर सरळ माझ्याकडे संपर्क साधा असे सांगत माझ्या आजूबाजूला हुजूरेगिरी करणारे पदाधिकारी मला नको आहेत असा दमही त्यांनी यावेळी त्यांच्या अवती भवती असलेल्या नेत्यांना भरला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *