Breaking News

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा …अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल

पुणे: प्रतिनिधी

लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे येथे झाला. शासनाने योग्य ते पाऊल उचलले नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन येत्या ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉक डाऊनला विरोध केला. लॉक डाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची पाळी येईल, अशी भीती या कामगारांना वाटली आणि त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला. या अगोदर ही शासनाला आपण विनंती केली होती की दोन महिन्याचे अन्नधान्य मोफत वाटले असते तरी चालले असते, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची सुरुवात वांद्रे येथे झाल्याचा त्यांनी सांगितले.

शासनाने कृती करण्याऐवजी आम्ही २१ दिवसांमध्ये कोरोना कसा थांबवला त्याचे ते गुणगान करीत राहिले. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही किंवा तसा खुलासाही झाला नाही. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.

दरम्यान, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी अशाच कामगारांनी सरकार विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनावरील नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्रा पाठोपाठ आता गुजरातमध्येही लॉक डाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *