Breaking News

भास्कर जाधव यांचे आवाहन, सत्तेने उन्मत झालेल्या हत्तीवर नियंत्रण ठेवायचे काम माहुताचे…. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यावर साधला निशाना

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून करण्यात आली. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांचं कौतुकही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं. यानंतर भास्कर जाधव यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भास्कर जाधव यांनी खडे बोल सुनावत म्हणाले, आपला शब्द फिरविण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही. विजयराव सत्तेने उन्मत्त झालेला जो हत्ती असतो, त्या हत्तीवर बसणारा जो माहुत असतो तेव्हा त्याच्या हातात त्रिशूळ असतो. सत्तेने उन्मत्त झालेला हत्ती आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे असा प्रेमळ सल्लाही दिला.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आपल्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे? तर लोकशाहीचं खरं सौंदर्य हे आहे की एका बाजूला सत्ताधारी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष. सत्ताधारी पक्षाला जितकं महत्त्व लोकशाहीत आहे, त्यापेक्षा कांकणभर जास्त महत्त्व विरोधी पक्षाला आहे. त्याचं कारण असं आहे की आपली घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली. त्यातच ही तरतूद आहे. कधी कधी असं होतं की सत्ताधारी पक्ष निरंकुश होतो. सत्ताधारी पक्षावर जर अंकुश राहिला नाही तर कुठलीही निरंकुश सत्ता केवळ राजकारणच नाही तर व्यवहारातली असेल किंवा व्यवसायातली असेल ही निरंकुश सत्ता विनाशाकडे वाटचाल करते.

भास्कर जाधव म्हणाले, ही निरंकुश वाटचाल धोकादायक आहे. त्यामुळे विरोधी पक्ष तितकाच महत्त्वाचा असणं महत्त्वाचं आहे. विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना, काँग्रेस या दोन्ही पक्षात केलेली कामगिरी आणि त्यांची वाटचाल आपण पाहतो आहोत. मला विजय वडेट्टीवार आणि सत्ताधारी पक्षालाही हे सांगायचं आहे. विजय वडेट्टीवारांविषयी सगळ्यांनीच चिंता व्यक्त केली की त्यांना चांगलं खातं मिळालं नाही. अशी फार मोठी चिंता सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली. तुम्ही त्याबद्दल भारावून जाऊ नका आणि चिंताही करु नका. तुमची नोंद इतिहासात अशी होईल की विजयरावांना चांगली खाती मिळाली नाहीत तरीही विजयरावांनी पक्ष सोडला नाही. ज्यांना ज्यांना सगळं मिळालं ते इकडून उठले आणि पलिकडे गेले. आता विजय वडेट्टीवारांनी ठरवायचं आहे की आपली नोंद कुठे करायची? असा टोला भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, लोकशाहीत तीन पदं खूप महत्त्वाची आहेत. पहिल म्हणजे अध्यक्ष महोदय आपलं पद, दुसरं माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्रीपद आणि तिसरं विजय वडेट्टीवार यांना मिळालेलं विरोधी पक्षनेते पद. नियतीच्या काय मनात आहे मला माहित नाही. पण आपण तिघेही एके काळचे शिवसेनेचे आहोत. विजयरावही शिवसेनेत होते, एकनाथ शिंदेही शिवसेनेचे आणि मी तर शिवसेनेचे आहेत. आज हे खूप मोठं सौंदर्य आहे असं मला वाटतं. विजयराव तुम्हाला खूप मोठं काम करावं लागणार आहे. वर्षभरापूर्वी आपलं सरकार होतं. मी सरकारमध्ये होतो. पण त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळी ही मंडळी तीन पायाचं सरकार, तीन चाकांचं सरकार म्हणून चेष्टा करत होते, टिंगल करत होते. आता काय म्हणत आहेत स्वतःच्या सरकारला? त्रिशूळ सरकार.

पुढे भास्कर जाधव म्हणाले, माझे मित्र देवेंद्र फडणवीस हे बोलण्यात अत्यंत चतुर आहेत. शब्द कसा फिरवायचा यात तुमचा हात कुणीही धरु शकणार नाही. विजयराव सत्तेने उन्मत्त झालेला जो हत्ती असतो, त्या हत्तीवर बसणारा जो माहुत असतो तेव्हा त्याच्या हातात त्रिशूळ असतो. सत्तेने उन्मत्त झालेला हत्ती आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मला माहित नाही तुम्हाला सीबीआयची, ईडीची, एनआयएची नोटीस आली आहे का?, इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे का? तेही माहित नाही. विजयराव कुणाचीही नोटीस येऊ द्या. लोकशाही वाचवण्यासाठी कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याचं भान तुम्ही ठेवा. सरकारने चांगली कामं केली तर पाठिंबा द्या, पण जिथे चुकतं आहे तिथे तुम्हाला अंकुश ठेवावाच लागेल असाही सल्ला भास्कर जाधव यांनी दिला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *