Breaking News

ग्रामीण युवकांना मिळणार कॅपजेमिनी कडून प्रशिक्षण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन विभागाचे उपाध्यक्ष अनुराग प्रताप यांनी याबाबत सादरीकरण केले. राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी काही प्रशिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कंपनीचा उपक्रम चांगला आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी, चांगली संधी मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. सध्या कंपनीच्यावतीने राज्यातील बारा महाविद्यालयात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास राज्यातील विविध जिल्ह्यांत हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. यावेळी कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, आरती श्रीवास्तव, ऋता साटम आदी उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन जालना जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांचा स्तर आणखी उंचविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्या दरम्यान हा करार करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज हा करार करण्यात आला. प्राथमिक टप्प्यात जालना जिल्ह्यातील घनसावंगी जालना आणि अंबड तालुक्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे, असे श्री टोपे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या या कार्यक्रमाला कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी आरती श्रीवास्तव, अनुराग प्रताप, प्रतिभा शर्मा, अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे प्रमुख मॅथ्यू जोसेफ, डॉ. महेश श्रीनिवास आदी उपस्थित होते. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

या सामंजस्य करारानुसार आशा वर्कर्स यांना टॅब , पॉईंट केअर डिव्हाईस, डिसीजन सपोर्ट सिस्टीम, आशा वर्कर्स यांच्या कामकाजाचे डिजिटायझेशन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रकल्प पुढील पंधरा महिन्यांच्या कालावधीत सुरु राहील, असे टोपे यांनी सांगितले.

या सामंजस्य करारानुसार जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी एकत्रित काम करणार आहे. यामध्ये जालना जिल्हा परिषद पुढाकार घेऊन काम करेल. तसेच आवश्यक असणारी सर्व मदत पुरवेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल यांनी दिली.

कैपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा यांनी सांगितले की, आरोग्य सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी कंपनी डिजीटल सहाय्य देईल. आशा वर्कर्स यांच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येण्यासाठी कंपनी माहिती तंत्रज्ञान सहाय्य करेल.

यावेळी जालना जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, सल्लागार डॉ. संतोष भोसले, कैपजेमिनी कंपनीच्या ऋता साटम आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *