Breaking News

पंकजा मुंडे यांचा इशारा, संकटानों तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकत नाही स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यतिथीनिमित्त आयोजित सभेत विरोधकांची काढली आकौत

सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडला. निर्भिड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. माझ्या जीवनात एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसं ते कळणार देखील नाही असा इशारा भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला.

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. या निमित्त बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत स्मृतिदिनाला गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना गोपीनाथ गडावर येता आलं नव्हतं. मात्र आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर आले होते. या प्रसंगी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण करताना शिवराजसिंह चौहान यांचे कौतुक केले. तसेच, माझ्या पराभवाने मला खूप शिकवले असल्याचेही बोलून दाखवले.

तुम्ही माझी चिंता करून नका. मला सगळे विचारतात तुमचं काय भविष्य आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे. माझ्या पराभवाचं देखील मला सोनं करता आलं, याच्या एवढी पुण्याई कोणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. पराभव मला शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या सरळ स्वभावाच्या, सात्विक, एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. तिथून शिकून मी तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मी तुम्हाला एवढच सांगेन की या मंचावर बसणारा कोणी असेल, ते आपलं भविष्य घडवू शकत नाहीत, ते तुम्ही आहात. एखाद्याचं भविष्य घडवू आणि बिघडवू शकणारे. ते तुमच्याच हातात आहे. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसं आपल्याला बांधून ठेवता येईल, कसा एक एक माणूस कामाला लागेल हे आपल्याला करायचं आहे असेही त्या म्हणाल्या.

कोणी कितीही मला नाव ठेवलं की, ताई तुम्हाला हे जमलंच नाही. मला नाही जमलं कुणाचं हृदय तोडणं, मला नाही जमलं लोकांना पोसणं, पैसे खाऊ घालणारे लोक सांभाळणं. मला जमलं ते सामान्य माणासाशी नाळ जोडून ठेवणं. त्यामळे सत्व सोबत ठेवून तत्वाने काम करून आपल्या मनात लोकांच्या बाबतीत ममत्व पाहिजे. हे ममत्व शिवराजसिंह चौहान यांना इथपर्यंत घेऊन आलं आहे. आज त्यांच्या येण्यामुळे मी खूप आनंदी झाले आहे. दु:खाच्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं आहे. मी त्यांचे स्वागत करते आणि महाराष्ट्र सरकारला देखील अशाप्रकारची बुद्धी लाभो, अशाप्रकारची प्रेरणा लाभो. आमच्या शिवराजसिंह चौहान यांचं त्यांनी अनुकरण करून या महाराष्ट्रातील समस्त ओबीसींवर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढावं. ओबीसीचे मोर्चे, मेळावे घेणं आणि ओबीसीचा मी नेता आहे, हा नेता आहे यासाठी ओबीसी आरक्षण आम्हाला नकोय. या ओबीसीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्हाला आरक्षण सुरक्षित पाहिजे. म्हणून मला वाटतं की आजच्या या दिवशी नक्कीच चांगली बातमी या सरकारकडून येईल आणि शिवराजसिंह चौहान यांचं सरकार देखील त्यांना मदत करेल, हा विश्वास मी व्यक्त करते असेही त्यांनी सांगितले.

सूर्योदय पण कधी काळा असतो का? असं जर कोणी मला विचारलं तर ३ जूनचा सूर्य काळा दिवस घेऊन जन्मला असं जर मी म्हणाले तर ते वावगं ठरणार नाही. रामायण धर्म सांगते तर महाभारत कर्म सांगते. पण कर्माशिवाय धर्म नाही आणि धर्माशिवाय कर्म नाही. धर्म म्हणजे हिंदू-मुस्लीम नसून, धर्म म्हणजे मानवता धर्म आहे हे आम्हाला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं आहे. ज मला माझ्या वडिलांच्या आशीर्वादाचा अनुभव येतोय. ऊसतोडी करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी जन्माला येऊन एक व्यक्ती जेव्हा देशाच्या राजकारणात एवढं मोठं स्थान मिळवतो. त्याची माणसं, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला किती अभिमान वाटतो. आज मला तो दिवस आठवतोय, तसं पाहिलं तर आज गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतीदिन आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला देखील आठ वर्षे झाली आहेत आणि मोदींच्या सरकारमध्ये मुंडेंचा चेहरा बघण्यासाठी तरसणारे लोक गोपीनाथ मुंडेंचा सत्कार देखील करू शकले नाहीत. इथेच त्यांचा सत्कार समारंभ होणार होता, परंतु आम्हाला अंत्यसंस्कार करावा लागला अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

एखाद्या चित्रपटाची कथा असावी तसं गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याची घटना झाली. लोक विचार करू लागले की आता हे एवढा मोठा आघात आम्ही कसा सहन करणार? गोपीनाथ मुंडेंची जागा कोण घेणार? तर त्या लोकांना सावरण्याचं काम करण्यासाठी एक गोपीनाथ गड मी निर्माण केला. हे माझ्यासाठी नाही, हे त्या लोकांसाठी आहे जे आज सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. यांचा काहीच स्वार्थ नाही, यांना माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. त्यांना एकाच व्यक्तीला पाहायचं आहे, जो गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करतो आणि गरिबांचं, वंचितांचं काम करतो. कोणता मुख्यमंत्री असा असेल जो मुलींची पूजा आपल्या हाताने करून त्यांच्या चरणावर फूल अर्पण करून त्यांचे दर्शन घेत असेल. हा साधेपणा आम्हाला खूप आवडली आहे, त्यामुळे आजपासून आपलं नातं बनलं आहे. मध्यप्रदेशची मी प्रभारी जरी राहीले नाही तरी तुमच्याशी जन्मभराचं नातं आमचं आणि आमच्या लोकांचं बनलं असल्याचे त्या म्हणाल्या.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *