Breaking News

अखेर राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकाविला तिरंगा झेंडाः खर्गेंचे अमित शाहना पत्र जवळपास ८ राजकिय पक्ष राहणार उपस्थित

भाजपाच्या हिंदूत्वादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने धर्मनिरपेक्ष भारत एकच असल्याचा संदेश घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. जवळपास सहाशे किलोमीटरहून अधिक अंतर आणि जवळपास ६ते ७ महिने ही भारत जोडा यात्रेने देशातील जवळपास बहुतांश भागातून जात काश्मीरातील लाल चौकात आज पोहोचली. लाल चौकात पोहोचल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या यात्रेतील सहकाऱ्यांनी तिरंगा झेंडा फडकाविला.

लाल चौकात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर राहुल गांधी हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. यापूर्वी भाजपाच्या काही नेत्यांनी हिंदूत्ववादी राजकारणाचा भाग म्हणून लाल चौकात तिरंगा झेंडा फडकाविण्याचा प्रयत्न केला होता.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी १२ वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर कांग्रेस नेते देखील उपस्थित होते. लाल चौकात तिरंगा फडकवण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या प्रवासाला निघाले. राहुल गांधी पुढे गेल्यानंतरही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लाल चौकात सेलिब्रेशन केले.

यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू देखील उपस्थित होते. सुक्खू म्हणाले की, समाजात जेव्हा तिरस्कार वाढत होता तेव्हा राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंतची ही यात्रा सुरू केली. तिरस्कार सोडून भारत जोडा असं या यात्रेचं ब्रीद आहे. कोणीही या देशाच्या स्वातंत्र्याला धक्का लावला तर काँग्रेस ते सहन करणार नाही असा इशारा दिला.

भारत जोडो यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. यापार्श्वभूमीवरील समविचारी असलेले १२ विरोधी पक्ष सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. या समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केलं होतं. परंतु त्यापैकी काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश असल्याची माहित पुढे येत आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने चुका केल्याचं काँग्रेसचं म्हणणं असून उद्या समारोपाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणेत कोणत्याही त्रुटी राहु नये यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. तसेच यात्रेसाठी पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करावी यासाठी अमित शाह यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसात भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतील, तसेच ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मोठा मेळावा होईल. यात अनेक राजकीय पक्ष सहभागी होत आहेत. तुम्ही वैयक्तिकरित्या सबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या तर मी तुमचा आभारी राहीन असेही पत्रात नमूद केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *