कल्पेशने पुन्हा एकदा पेटी उघडली, प्लास्टिकच्या पिशवीत दोन तुकडे झालेलं पासबुक बघितलं. काहीसा विचार केला पुन्हां पासबुक पाहून तसंच पेटीत ठेवलं. रडणाऱ्या पोरीला शांत पाळण्यात झोपवलं आणि उठून शेतावर निघाला. चालताना रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत राहिला, “बँकेत जाणार हायस का रं? ” कोणी हो बोलें पण कामं असल्यामुळे कल्पेश बँकेतलं त्याचं काम सांगण्या आधीच लोकं पुढे निघून जात. शेवटी शेतावर येऊन कल्पेश खोपटात बसल, समोर उभारी आलेल्या शेताला डोळे भरून पहात बसला. अंगात त्याच्या थरथर उठली डोळे लाल होत गेले, एकदम उठला हातात फावडं धरलं आणि अख्ख शेत जमीनदोस्त करावं का? एक पाऊलं पुढं टाकणार इतक्यात मोठ्या छकुलीचा आवाज आला ” पप्पा बाय उठलेय रडतेय”
कल्पेशने राग आवरून तसंच फावडं खोपटीत अडकवलं आणि घराकडं निघाला. कल्पेशची बायको दुसऱ्याच्या वावरात मजुरीला गेलेली. दुपारी जेवायला येणार होती, पण कामं जास्त असल्यामुळे दुपारी आली नाही. छकुली डब्बा घेऊन गेली. कल्पेश पोरीला झोपवून मधुकडं गेला. मधू गावातला हुशार माणूस बाहेर काय चाललाय काय नाय हे त्याला सगळं माहिती. कल्पेशने मधूला विचारलं काय “माल जातोय का भायेर.”? मधू बोलला ” बावा आंदोलन लय चिघळलंय, अन् त्यात शेतकऱ्यांना आतंकवादी कोण तरी बोलला त्यावरन तर जाळ झालंय. भरलेल्या गाड्या अडवून नासधूस चाललेय जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार. मग आपली शेत कुसली तरी चालतील “. कल्पेश ने पुन्हां एक प्रश्न केला “ते सरकार पाचशे पाचशे खात्यावर जमा झालं करणार व्हतं त तरी झालं काय “? यावर मधू फक्त हसला “आर ब्वा दररोज कोण ना कोण त्या पाचशे रुपयेच्या चक्करमधी लोकं हजार रुपये येण्या जाण्यात खपवून बसलेत. पण अजुन काय आलं नाय”. कल्पेश तोंड पाडून तसाच निघाला. येशा म्हतारा बांधावर बसला होता. तो मोठं मोठ्याने ओरडत होता ” रोड येणार रोड येणार चार पदरी म्हणून आमच्या जमिनी कमी पैशात लाटल्या या सरकारन पोराच्या गुवाच्या भावाला जमिनी घेतल्या” येशाचा पोरगा सरकारने कमी किंमतीत लाटलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून सारखा मंत्रालयात जायचा शेवटी कंटाळून मंत्रालयाच्या दारात विष पिऊन मेला, सरकारने ती हत्या व्यवस्थित पचवली, तेंव्हापासून केशा आपल्या एकुलत्या एक पोराच्या जाण्याने बांधावर बसून सरकारला उभा आडवा फडात असतो. कल्पेश घरात येऊन ओटीवर बसला रागा रागात फावडं उचललं आणि तडक शेतकडं निघाला. वावर एकदा डोळे भरून बघितलं आणि एका बाजूने वावर जमीन दोस्त करायाला सुरुवात करणारच इतक्यात मधूचा पुतण्या अन्या धावत आला, “कल्पेश दादा आर डोकं फिरलं काय चल लवकर आपल्याला तालुक्याला निघायचंय मोर्चा न्यायचाय “. कल्पेश फावडं हातात धरून तसाच उभा राहात बोलला, ” आता कसलं मोर्चा आता जगुन काय फायदा नाय या सरकारन पार कंबरड मोडलय बघ, माणसं जगवायची की शेती आणि या सगळ्यात आपण कधी कसं जगायचं हा मोठा प्रश्न पडला, मरूदे मोर्चाचा काय फायदा नाय होणार “, एवढं बोलून पुन्हा फावड्याने उकरायला सुरुवात केली. शेवटी मन्याने त्याच्या हातातलं फावडं ओढून घेतलं आणि त्याचा हात पकडून सरळ मधुकडे घेऊन गेला.
बरेच से लोकं जमलेले, मधू बोलत होता ” आता आपण रडायचं नाय आता रडलो तर भविष्यात आपलें डोळे शिल्लक राहणार नाही. सरकारन आधीच आपला कणा हाणलाय. आपण लढायचं आपल्याला न्याय मिळे पर्यंत. सगळ्यांनी किसान संघटनेचा जयघोष करून तालुक्याच्या दिशेने कूच केली. बाकीच्या वेगवेगळया गावातील संघटना त्यांना मिळतं गेल्या शंभर लोकांच्या जमावाने आता हजारोच्या संकेने दिसू लागली. मोर्चा तालुक्याला पोचला आणि एकचं गोंधळ झाला. कोणाला काही जण शिव्या देत आणि देशद्रोही म्हणून ते मारत सुटलेत. चार पाच जणांचा जमाव कल्पेश आणि त्याच्या सोबतच्या चौघाकडे आला कपाळाला भगवे शेले, टिक्के लावलेले पक्षाचे हातात झेंडे आणि दुसऱ्या हातात जाड जाड काठया, त्यातल्या एकाने कल्पेशच्या दंडावर जोरदार फटका मारला ” काय रे भाडयानो अतिरेक्यानो आमच्या विरोधात मोर्चे काढताय? तुमचा नाय माज उतरवला ना तर आमचं सरकार नाय “. असं बोलून डोक्यात जबर लाठीचा फटका हाणला त्या फाटक्या बरोबर कल्पेश खाली कोसळला. तो कोसळल्या बरोबर मारणारे पुढे हाणत गेले कल्पेश तिथेच बसला. तिथेच पडलेला झेंडा फाडून भळभळणाऱ्या डोक्याला आवळला. लाठी मारणाऱ्यांना आवरायाला खूप उशिराने पोलीस आले खरे पण खूप उशिर झाला होता. अनेकांच्या शरीरावर लाठयांचे वळ उठलेले.
एकत्र झालेले शेतकरी बांधव पुन्हा ऐकवटले एक डोक्याला लाल फडक बांधलेला तरुण तडफडदार पोरगा पुढे आला. त्याच्या कपाळावरून रक्ताचा ओघळ वाहत असतानाच तो डोळ्यांत आग आणून बोलू लागला. “सरकार कोणाचही असो ते आपली चामडी ओरबाडून त्यांच्या फाटक्या झोळीला लावून झोळी अजुन मजबूत करतात. या सरकारने अख्खी माणसं ओरबाडलेत. कार्पोरेटवाल्यांच्या खिसा अधिक मजबूत करून आपल्या वावराला कांडी लावलीय या सरकारनं” एवढं बोलता बोलता एक मोठा जमाव पुन्हा आला त्यांच्या हातात दगड होते चेहऱ्याला रुमाल होते. पोलिस नेमके कोणाच्या बाजूने होते हे कळेना. त्यात पोलिसांच्या वेषात भलतेच कोणी असावे अशी खात्री झाली. कल्पेश रक्तबंबाळ झाला तिघा चौघांनी उचलला त्याच्या डोक्यात कोणीतरी जबर दगड घातला होता. कल्पेशला हास्पिटलला नेला तीन चार दिवसांनी जेंव्हा त्याने डोळे उघडले तेंव्हा मधू आला. मधूचे डोळे पाण्याने भरलेले. कल्पेशने मधूला बसक्या आवाजात विचारले. मधूदा आपण जिंकलो का ? मधू बोलला “मित्रा आपली लढाई आता सुरु झालीय, आपण कधीच जिंकणार नाही. एका एका हक्कासाठी असंच मरत राहावं लागणार. आपण जिंकण्यासाठी नाही आपलें हक्क अधिकार जपण्यासाठी लढत राहतो. कल्पेश निरुत्तर झाला थोडावेळ शांत होऊन मधूला बोलला. “आपल्याच घरात आपल्याच चपातीसाठी लढावं इतके वाईट दिवस कुठच्याच देशावर येऊ नये. आपण लढू आणि जिंकू ही “.मधुने स्माईल दिली कल्पेशही हसत बोलला “, आता मीही तयार आहे. मग आता कोणी देशद्रोही म्हणून भर रस्त्यात गोळ्या घालून जरी कोणी मारलं तरी माझी आपल्या हक्कासाठी लढायची पूर्ण तयारी आहे. डोकं फुटलाय पण मेंदू अजून मजबूत हाय “.