Breaking News

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे राज्यात जनआंदोलन दोन कोटी सह्यांचे निवेदन पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करणार

नाशिक- मुंबई: प्रतिनिधी

केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून  शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील काँग्रसचे जनआंदोलन  हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज राज्यभरात किसान मजदूर बचाओ दिवस पाळण्यात आला. राज्याच्या सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव जि. नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर आ. हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, प्रदेश सरचिटणीस माजी खा. डॉ. उल्हास पाटील, माजी आ. अनिल अहेर, शिरीष कोतवाल, गुणवंत होळकर, जयश्रीताई पाटील राजाराम पानगव्हाणे प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकरी, कामगार विरोधी कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेचा शुभारंभ लासलगाव येथे आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमात करण्यात आला. राज्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज बुलंद करत आहेत. राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ही संघर्षाची सुरुवात आहे, शेतकरी हितासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू. मोठ्या संघर्षातून आणि प्रयत्नांतून बाजार समिती आणि हमीभाव ही व्यवस्था उभी राहिली. जुलमी कृषी कायद्यामुळे भाजप सरकार ही शेतकरी हिताची व्यवस्था मोडीत काढत आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या आजच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात व्हर्च्युअल किसान मेळावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रातील सरकार, ‘हम करोसे कायदा, आम्हाला वाटेल ते नियम करु’ अशा हुकुमशाही प्रवृत्तीतून त्यानी लोकसभा व राज्यसभेत हे कायदे मंजूर केले आहेत. अशा कायद्याच्या माध्यमातून देशाची लुट करायचे काम सहा वर्षापासून सुरु आहे. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लुटले तशाच पद्धतीने आता भाजपाच्या रुपाने व्यापारी देशाला लुटत असल्याचा आरोप केला.

मुंबईतील आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खा. एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव यांनी हिंगोली मध्ये तर अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आले. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले. गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड येथे आंदोलन करण्यात आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *