Breaking News

मुख्यमंत्री ठाकरें म्हणाले, तर पोटदुखी होणाऱ्यांवर उपचार करावाच लागेल मराठीचा विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी, दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट असल्याचा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत मराठी भाषेत बोला, असे म्हटले की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. पण जेव्हा आम्ही मराठीचा आग्रह धरतो तेव्हा ज्यांची पोटदुखी होते त्यांच्यावर उपचार करावाच लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. मातृभाषेचं मंदिर आजच्या शुभमुहूर्तावर उभं राहात आहे. मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन आज होत आहे. मुख्यमंत्री म्हणून काही जबाबदाऱ्या पार पाडतांना काही जबाबदाऱ्यांमुळे आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद देणाऱ्या असतात. मुंबईसाठी आजोबा लढले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले आणि आज मुख्यमंत्री म्हणून माझे नाव या इमारतीच्या भूमिपूजनाच्या पाटीवर लागले यापेक्षा माझ्या जीवनाचे दुसरे सार्थक असूच शकत नाही. आजची जबाबदारी माझ्यासाठी अशीच माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद देणारी असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठी माणुस म्हटलं की संघर्ष आलाच असे सांगत भाषेनुसार प्रांतरचना झाली. मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. त्याचे स्मारक ही येथे जवळच आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

चर्चेतून आराखडा तयार होतो पण प्रत्यक्ष काम होत नाही. आपण आज प्रत्यक्ष काम करत आहोत. आपण जे काम करू ते जगातलं सर्वोत्तम काम असावे. देशातीलच नाही तर परदेशातील माणसं ही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावे हे त्याला इथं येऊन कळावे. मातृभाषेचं मंदिर पहायला जगभरातून लोक यावीत. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. मराठी भाषा भवनाला लागून मराठी रंगभूमी दालन उभे राहात आहे. मराठी रंगभूमीला स्वत:चा वैभवशाली इतिहास आहे. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पारतंत्र्य काय आहे हे आपल्याला बघायला मिळालं नाही हे आपलं नशिब आहे. पण इंग्रजांच्या राजवटीत डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहून इंग्रजाच्या डोक्‍यात मराठीला नेले ते लोकमान्य टिळकांनी असेही ते म्हणाले.

प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण. हे काम सुभाष देसाई यांनी हाती घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यांनी हे केलं नसतं तर आपण असतो की नाही, हा भगवा असता की नाही काही कळत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलिते ही सोप्या भाषेत केले. इतर भाषेचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमण ही नको असे सूचक वक्तव्यही त्यांनी परप्रांतीयबाबत केले.

कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देत राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल असा उपरोधिक टोला भाजपाला लगावला.

अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार आहेत. कदापि सहन केले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी भाजपाला देत आम्ही शिवरायांचे मावळे आहोत असेही ते म्हणाले.

छत्रपतीच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचं तेज तळपलं पाहिजे. महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या मातृभाषेचे हे मंदिर आहे, याचे काम करतांना कुठलीही कमी नसावी अशी सूचनाही त्यांनी मराठी भाषा विभागाला केली.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *