Breaking News

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याची शक्यता असून त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या ‘इन्कलुसिव्ह ॲटलास इंडिया २०२४’ या नकाशांच्या पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने सदर ब्रेल तसेच सामान्य लिपीतून हा ॲटलास तयार केला आहे.

दिव्यांग व्यक्तीसाठी संसदेने विधेयक तयार केले त्या समितीचे आपण अध्यक्ष असल्याचे नमूद करून स्पर्शजन्य नकाशांच्या पुस्तकाच्या माध्यमातून दृष्टिबाधित विद्यार्थी व मोठ्यांना विविध खंड, देश, महासागर, समुद्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सीमा यांची माहिती मिळेल तसेच स्पर्शजन्य आकृतींच्या माध्यमातून जीवशास्त्र, भूगोल, गणित विषय देखील समजणे सुलभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी नॅबला दिलेल्या निधीतून खरेदी केलेल्या ‘ब्रेलो’ मशीन मुळे दृष्टिबाधित मुलांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाची छपाई तसेच निवडणुकीसंबंधित वोटर स्लिप छापण्यास मदत होत असल्याची माहिती ‘नॅब’चे मानद सचिव डॉ विमल कुमार डेंगला यांनी यावेळी दिली. स्पर्शजन्य ग्राफीफ ॲटलास प्रकाशन सोहळ्याला नॅबचे मानद सचिव हरेंद्र कुमार मलिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, रमाकांत साटम, सुनील कपूर, गुंजना मालवीय आदी उपस्थित होते.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *